दीनदयाळजी
ऐक्य समूह
Wednesday, September 01, 2010 AT 10:50 PM (IST)
एकदा दीनदयाळजी बाजारात भाजी आणावयास गेले असता एक वृध्द बाईजवळून त्यांनी भाजी विकत घेतली. नंतर दीनदयाळजींनी नेहमीप्रमाणे सर्व हिशोब लिहिला व पैसे परत ठेवताना त्यांच्या लक्षात आले की, आपल्या खिशातील एक खोटा पैसा त्या वृध्द स्त्रीला भाजीचे पैसे देताना चुकून दिला गेला. आपण त्या म्हाताऱ्या बाईला नकळत का होईना फसविले, याचे दु:ख त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते. ते पुन्हा बाजारात गेले व म्हातारीजवळ जाऊन म्हणाले, "बाई, मी तुम्हाला चुकून खोटा पैसा दिला, हा खरा पैसा घ्या आणि खोटा मला द्या.' त्या भाजीवाल्या बाईला वेळ नव्हता. ती दीनदयाळजींना म्हणाला, "राहू दे, एका पैशाचे काय मोठे?' पण दीनदयाळजींना रहावेना. ते आर्जवी स्वरात म्हणाले,"नाही, मी तुम्हाला फसविले, माझी चूक मला सुधारु द्या'. दीनदयाळजींचा तो निरागस चेहरा पाहून तिने आपला गल्ला असलेली पेटी समोर ठेवली. बाह्य जग विसरुन दीनदयाळजींनी एकाग्रपणे तो गल्ला तपासला. त्यांना तो खोटा पैसा त्यात मिळाला. मोठ्या आनंदाने तो खोटा पैसा त्यांनी घेतला आणि त्या बाईला सांगून त्यात खरा पैसा टाकला. त्या म्हाताऱ्या बाईने मोठ्या कौतुकाने दीनदयाळजींकडे पाहिले व "देव तुझे भले करो,' असा तोंड भरुन आशीर्वाद दिला. पुढे याच दीनदयाळजींनी "एकात्म मानववाद' मांडला. तात्पर्य : देशाला, समाजाला आर्थिक शोषणातून बाहेर काढण्यासाठी आदर्श ठेवून काम करावे.