Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

"पीपली लाईव्ह' चा नायक "नत्था'
ऐक्य समूह
Wednesday, September 01, 2010 AT 12:22 AM (IST)
Tags: lolak

शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं वास्तव विडंबनेद्वारे जनतेसमोर आणणारा, अमीर खानचा "पीपली लाईव्ह', हा चित्रपट साऱ्या देशभर गाजतो आहे. या चित्रपटांना अमीर खानला कोट्यवधी रुपये मिळतील, पण या चित्रपटाचा नायक ओंकारदास माणिकपुरी उर्फ "नत्था'ची आर्थिक परिस्थिती मात्र पूर्वी होती तशीच गरिबीचीच असल्याचं जळजळीत वास्तव चव्हाट्यावर आलं आहे. या चित्रपटाचा नायक नत्थाची ओंकारदासनं समरसून केलेली भूमिका प्रेक्षकांनाही खूप आवडली. अभिनेता अमिताभ बच्चन यांनीही त्याच्या अभिनय गुणांची मुक्त कंठानं प्रशंसा केली. हा चित्रपट देशभर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आणि ओंकारदासही लोकप्रिय झाला. एका दिवसात तो हिंदी चित्रपटसृष्टीतला ख्यातनाम अभिनेता झाला. पण, या चित्रपटातल्या प्रचंड प्रसिध्दीनं आपलं पोट भरणार नाही, हे लक्षात येताच, त्यानं छत्तीसगढ राज्यातलं आपलं भिलाई शहर गाठलं. तो परतताच भिलाईतल्या हजारो चाहत्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. विविध उपग्रह दूरदर्शन वाहिन्यांच्या छायाचित्रकारांची भाऊगर्दीही त्याची मुलाखत मिळवायसाठी आले होतेे. लोकांचा गराडा तर त्याच्या भोवती सदैव असतोच. ओंकारदास हा आता भिलाई शहराचं भूषण ठरला आहे.
"पीपली लाईव्ह' खूप गाजला. तरीही आपल्याला उदरनिर्वाहासाठी पुन्हा रोजगारी करावीच लागणार, याचं भान ओंकारदासला असल्यानंच, तो आपल्या भोवतीची ती गर्दी कधी ओसरेल, याची वाट पाहतो आहे. त्याचं घर दगड, विटांचं कच्चच असल्यामुळं, लोकांना भेटायसाठी त्यानं सध्या आपल्या बहिणीच्या घराचा तात्पुरता आश्रय घेतला आहे. या चित्रपटाचं मानधन आपल्याला खूप मिळालं असावं, असं लोकांना वाटतं, पण तसं घडलेलं नाही. मिळालेल्या मानधनातनं हे जुनं घर आपण सिमेंट कॉंक्रिटमध्ये बांधू शकत नाही, असं ओंकारदासनं आपल्या चाहत्यांना सांगून टाकलं.
त्याचे आई-वडील वीट भट्टीवर मजुरी करतात. वीट भट्टीच्या परिसरातच ओंकारदासचं बालपण गेलं. तो तिथंच लहानाचा मोठा झाला. कसं बसं पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतल्यावर, पोटाची खळगी भरायसाठी त्यानं वीट भट्टीतच मजुरीचं काम करायला सुरुवात केली. ती मिळाली नाही तर, तो भिलाई शहरात फिरून भाजीपाला विकत असे. बालपणापासून त्याला अभिनयाची ओढ होती. पण, गरिबीमुळं आपण नाटकात काम करू शकणार नाही, हे ही त्याला पक्कं माहिती होतं. बीबीसीनं 1999 मध्ये भिलाईत घेतलेल्या कार्यशाळेत ओंकारदास भीतभीतच गेला. तिथं त्याला साक्षरता आणि कुष्ठरोगावरच्या नाटकात भाग घ्यायची संधी मिळाली. हबीब तन्वीर हे त्या नाट्य समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी  ओंकारदासमधले अभिनयाचे गुण हेरले. त्याला त्यांनी नाटकासाठी रायपूरला नेले. तन्वीर यांच्या "नया थिएटर', या संस्थेचा ओंकारदास घटक झाला. याच संस्थेनं रंगमंचावर आणलेल्या काही नाटकातही त्यानं भूमिका केल्या. त्याची अभिनयाची हौस तन्वीर यांच्यामुळंच पूर्ण झाली. नया  थिएटरच्या नाटकातल्या ओंकारदासच्या अभिनयानं अमीर खान आणि दिग्दर्शक अनुष्का हे प्रभावित झाले. त्यांनी ओंकारदासला पीपली लाईव्हमधली नायकाची भूमिका द्यायचं ठरवलं आणि अचानक मिळालेल्या या संधीचं त्यानं अक्षरश: सोनं केलं. तन्वीर यांच्यामुळंच आपल्याला ही संधी मिळाल्याचं ओंकारदास विनम्रतेने सांगतो.
पीपली लाईव्ह चित्रपटाचं चित्रीकरण सुरु झालं तेव्हा कॅमेरासमोर जायला आपल्याला खूप भीती वाटत होती. पण, दिग्दर्शक अनुष्कानं तू रंगमंचावर काम करतोस, तसंच काम कर, घाबरू नकोस असं सांगितलं. अमीर खाननं धीर दिला. त्यानंतर मात्र या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना आपल्याला काही भीती वाटली नाही, आपण दरिद्री , कर्जबाजारी, शेतकऱ्यांची भूमिका समरसून वठवली. या चित्रपटामुळं शेतकऱ्यांच्या व्यथा आम जनतेपर्यंत गेल्या.
सारे लोक आपल्या नत्था तुम क्यों मरणा चाहते हो, असं विचारतात. पण, नत्थाला काय हवं आहे, असं मात्र कुणी विचारत नाही, याचं आपल्याला वाईट वाटते, असं ओंकारदास सांगतो. तीन मुलं आणि पत्नीसह काबाडकष्ट करीत संसाराचा गाडा हाकणाऱ्या ओंकारदासच्या जीवनात या चित्रपटानं काहीही बदल झालेला नाही. आपल्याला फक्त उदंड प्रसिध्दी मिळाली, सन्मान मिळाले पण त्यानं का पोट भरतं असा त्याचा सवाल आहे.
- वासुदेव कुलकर्णी

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: