सर्वार्थाने लोकपत्रकार
ऐक्य समूह
Wednesday, September 01, 2010 AT 12:27 AM (IST)
""साप्ताहिक ऐक्यचे दैनिकात रुपांतर करताना संपादक सुरेश पळणिटकर यांच्याकडे निर्धार, धाडस, परिश्रम आणि लोकमताचा पाठिंबा एवढेच भांडवल होते. त्या बळावरच त्यांनी दै. ऐक्यचा दबदबा निर्माण केला. सर्वार्थाने लोकपत्रकार असलेल्या सुरेश पळणिटकर उर्फ दादांचा बुधवार, दि. 1 सप्टेंबर 2010 रोजी (आज) आठवा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा हा मागोवा..''
लोकजागरण आणि राष्ट्रीय परंपरा असलेल्या "ऐक्य'चे संवर्धक चंडिराम हरी पळणिटकर यांचे 15 सप्टेंबर 1957 रोजी निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी स्व. कमलाबाई पळणिटकर यांनी काही काळ ऐक्यच्या संपादकपदाची धुरा सांभाळली. त्यावेळी आपल्या मातोश्रींना सुरेश पळणिटकर हे मदत करीत असत. काही काळाने सुरेश पळणिटकर यांनी साप्ताहिक ऐक्यच्या संपादकपदाची धुरा स्वीकारली आणि ऐक्य हे सातारा जिल्ह्याचे मुखपत्र करायचा निर्धार केला.
साप्ताहिक ऐक्यचे रुपांतर दैनिकात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा, जिद्द आणि अफाट परिश्रमाशिवाय त्यांच्याकडे काहीही भांडवल नव्हते. पण लोकबळावर हे दैनिक आपण यशस्वी करुच, असा आत्मविश्वास त्यांना होता. या भांडवलावरच त्यांनी 19 जानेवारी 1967 रोजी साप्ताहिक ऐक्यचे रुपांतर दैनिकात केले. साप्ताहिक चालविताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वत:चा छापखाना नसताना अन्य ठिकाणाहून ते छपाई करुन घेत. त्यानंतर ऐक्यचा स्वत:चा छापखाना मंगळवार पेठेत सुरू करुन तेथून ते प्रकाशित केले जावू लागले. सुरेश पळणिटकर यांनी दैनिक सुरू केल्यानंतर भागवत यांच्या छापखान्यात तासन्तास थांबून ते अंकाची छपाई करुन घेत असत. ऐक्यचा अंक आकर्षक व्हावा ही त्यांची तळमळ होती.
स्व. सुरेश पळणिटकर यांचे व्यक्तिमत्व चतुरस्त्र होते आणि पारदर्शकही होते. सातारा जिल्ह्यातील लोकजीवनाशी ते समरस झाले होते. जिल्ह्यातील लोकांच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांशी व भावभावनांशी ते तादात्म पावले होते. साताऱ्यासारख्या छोटेखानी जिल्ह्याच्या ठिकाणी संपूर्ण परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी दैनिक ऐक्य यशस्वी करुन दाखविले. ही कठीण कामगिरी त्यांनी अपार कष्ट, दुर्दम्य इच्छाशक्ती, दूरदृष्टी आणि व्यवहाराची सांगड घालण्याची किमया याच्या बळावर पार पाडली. सामाजिक अन्यायाचा कैवार घेण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. कोठेही कटुता न येता सामोपचाराने एखादा प्रश्न सोडवण्यावर त्यांचा भर होता. ऐक्य चालवताना लोकेच्छा, लोकहित आणि लोकभावनेची जाणीव त्यांनी सतत मनात ठेवली. सदासर्वदा सर्वत्र ऐक्य नांदावे या दृष्टीकोनातून ऐक्यची वाटचाल त्यांनी सुरू ठेवली आणि त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील जनतेच्या घराघरात आणि त्या घरातील प्रत्येकाच्या मनामनात ऐक्य रूजला आणि तो सर्वांना आपलाच वाटू लागला. जनतेचे ऐक्यशी असणारे नाते व ऐक्यवरील प्रेम ही ऐक्यची कधीही न संपणारी पुंजी त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर कमावली. ऐक्यला प्रगतिपथावर नेत असताना विविध प्रकारच्या सामाजिक कार्यानी त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा परिचय सर्वांना झाला.
ज्या व्यक्तींच्यापुढे नतमस्तक व्हावे, अशा मोजक्या व्यक्तींच्यामध्ये स्व. सुरेश पळणिटकर यांचा सहभाग होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून दादांनी ऐक्यची उभारणी केली. सातारा शहर आणि सातारा जिल्हा ही "ऐक्य'ची कार्यकक्षा त्यांनी फारशी वाढवली नाही. मात्र या क्षेत्राचा सारा तपशील, इथल्या भागातील कर्तृत्ववान माणसं यांची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यांना जिल्ह्याची खडान्खडा माहिती तर होतीच त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशाही त्यांना चांगली ठाऊक होती. जिल्ह्यातल्या बारीकसारीक तपशिलाबरोबर पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांविषयी त्यांना बारकाईने माहिती होती.
"ऐक्य'चा लौकिक
संपादक म्हणून सुरेश पळणिटकर यांची काही वैशिष्ट्ये होती. नवनवीन लोकांना लिहितं करण्यात त्यांना विशेष रस होता. आपल्या वृत्तपत्रात छापली जाणारी प्रत्येक ओळन्ओळ ते स्वत: तपासून देत. दिवसाकाठी बारा ते चौदा तास अथक परिश्रम घेणारे हे संपादक त्यांच्या कार्याने इतरांच्यापुढे नवा आदर्श निर्माण करणारे होते. अंकामध्ये छापल्या जाणाऱ्या बातम्यांचाच मजकूर नव्हे तर अनुषंगिक लेख, संपादकीय इतकच काय पण जाहिरातीमध्ये जाणारा मजकूरही त्यांनी स्वत:च्या नजरेखालून घातलेला असे. दैनिकावर अशी नजर ठेवणारे संपादक आता दुर्मीळ होत चालले आहेत. महाराष्ट्रात ऐक्य हे सर्वोत्कृष्ट दैनिक म्हणून ओळखले जावे ही त्यांची इच्छा होती, ते त्यांनी करुनही दाखविले. इतर अनेक वृत्तपत्रांच्या आक्रमणातही ऐक्य या वृत्तपत्राचे स्थान अबाधित ठेवण्यात त्यांनी यश संपादन केले होते. जिल्हा पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर शोभणारे एक उत्तम दैनिक असा ऐक्यचा साताऱ्यापासून
थेट दिल्लीपर्यंत त्यांनी लौकिक वाढविला होता.
"ऐक्य'चा परिवार पूर्णपणाने ऐक्यशी एकनिष्ठ आहे. त्यांची बांधिलकी ऐक्य वृत्तपत्राशी असून ती बांधिलकी वाचकांशीही जोपासलेली आहे. संपादकीय विभागाबद्दल त्यांना विशेष अभिमान वाटे. ऐक्यच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपल्या जीवाचे रान केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ऐक्यचे साम्राज्य उभे केले. आम्ही आमच्या प्रभावक्षेत्रात आमचे अव्वल स्थान सोडणार नाही, असा त्यांचा दृढ विश्वास होता. प्रथमपासूनच्या वाटचालीत अनेक पत्रकार "ऐक्य' विद्यापीठातून शिकून गेले. त्यांचा करारी बाणा सर्वांना ज्ञात असल्यामुळे त्यांचं केवळ उपस्थित असणं ही सर्वांना शिस्तप्रियता शिकवणारी ठरायची. अगदी कागदाला टाचणी कशी लावावी हेही ते जाताजाता शिकवून जायचे. शुध्द लेखन, वाक्यरचना याबाबत ते अतिशय दक्ष असायचे.
सातारा जिल्ह्यातील वृत्तपत्रसृष्टीवर त्यांनी अधिराज्य गाजवलं. वृत्तपत्र क्षेत्रात आज जीवघेणी स्पर्धा सुरू असताना ऐक्य खंबीरपणे या स्पर्धेला तोंड देत उभा आहे. याचे श्रेय त्यांच्या जबरदस्त इच्छाशक्तिलाच द्यावे लागेल. सुरेश पळणिटकर म्हणजे सळसळणारे मूर्तीमंत चैतन्य, ओसंडून जाणारा उत्साह, सतत कामामध्ये गर्क असणारे व्यक्तिमत्व! त्यांनी अखंडपणे, समर्थपणे, खंबीरपणे अत्यंत लहान वयात ऐक्यचे शिवधनुष्य पेलून स्वत:च्या साधनेने, परिश्रमाने आणि तपश्चर्येने महाराष्ट्राच्या वृत्तपत्रसृष्टीत इतिहास घडविला. सुरुवातीपासून कसल्याही अडथळ्याला, अडचणीला, संकटाला न जुमानता ऐक्यचा आलेख त्यांनी सतत उंचावत ठेवला. वयाच्या 19 व्या वर्षापासून शेवटच्या श्वासापर्यंत ऐक्यच्या वाटचालीची त्यांची लढाई सुरू होती. असीम मनोबल, दुर्दम्य इच्छाशक्ती, असामान्य निर्धारशक्ती आणि असाधारण निश्चयशक्ती याच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले.
जनतेचे मुखपत्र
स्व. यशवंतरावजींना वृत्तपत्रांची जाणीव होती. त्याचप्रमाणे आबासाहेब वीर यांनाही या माध्यमाचे सामर्थ्य माहिती होते. या दोन्ही मान्यवरांनी आपुलकीने, सातारा जिल्ह्याची गरज या दृष्टीने ऐक्यला सहकार्य केले. ऐक्यची धुरा सांभाळत असतानाच जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, सार्वजनिक संस्थांशी सुरेश पळणिटकर यांनी सक्रिय संबंध ठेवला. सहकारी संस्था, बॅंकांना त्यांनी मार्गदर्शन केले. अनेक क्रीडा संस्थांना त्यांनी सक्रिय सहकार्य केले. साहित्य संमेलन, नाट्य-संमेलन, सांस्कृतिक महोत्सव, क्रीडा स्पर्धा या सर्व कार्यक्रमांची छायाचित्रे आणि त्यांचा सारा मजकूर अगदी तपशीलवार अत्यंत वेगाने आणि तत्परतेने आपल्याकडे आला पाहिजे याबद्दल त्यांचा कटाक्ष होता.
राजकारणात पक्षोपक्ष असतात हे गृहीतच असते, पण त्यात अनेक गट, उपगट असतात. विविध नेत्यांच्यामध्ये आणि पुढाऱ्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असते. प्रत्येकाचे विशिष्ट अहंकार असतात. तीव्र सत्ता स्पर्धा असते. प्रत्येकाला आपल्या पक्षाची आणि गटाचीच बाजू प्रकाशात यावी असे वाटणे साहजिक असते. अशावेळी सर्व पक्षांना, गटांना आणि विविध नेत्यांना सांभाळून ठेवण्याची कसरत किती कठीण असते, हे त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांनाच समजते. मात्र प्रत्येक ठिकाणी हजरजबाबीपणा, प्रसंगावधान, समयसूचकता आणि जिव्हाळ्याच्या जोरावर दादांनी सतत सर्वांना राजी ठेवले. वेगवेगळे विचार प्रवाह, विविध सांप्रदाय, विविध संस्था, धार्मिक, आध्यात्मिक विचार या सर्वांंना त्यांनी ऐक्यमध्ये जागा दिली. त्यामुळे ऐक्य हे सातारा जिल्ह्यातील सर्व विचारांचे, पक्षोपक्षांचे, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचे भव्य व्यासपीठ झाले. या व्यासपीठावर आणि या रंगमंचावर सर्वांना खुला प्रवेश होता. त्यात कोणालाही मज्जाव नव्हता. साऱ्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील सर्वांचे प्रेम ही ऐक्यची शिदोरी आहे. ऐक्य व सातारा जिल्ह्यातील जनता यांचे एक अतूट नाते दादांच्यामुळे तयार झाले आहे आणि याहीपुढे उत्तरोत्तर ऐक्य डौलाने, मानाने, ऐटीने व तेजाने तळपत राहील.
- इलाही मोमीन