आत्म्याचे अस्तित्व
ऐक्य समूह
Tuesday, August 31, 2010 AT 11:07 PM (IST)
आता आपण काही प्रश्नांकडे वळू.
काल किंवा परवा एकाने "रामा'ला असा प्रश्न केला की, महाराज, आपण काय शिकविता? तुम्हाला आत्मा आहे काय? आत्म्याच्या अस्तित्वाविषयी तुम्ही उपदेश करता का? आत्मा आहे असे आपण मानता काय? रामाने उत्तर दिले, छे, मला आत्मा नाही. हे ऐकून त्याला फार आश्चर्य वाटले. आत्म्याचे अस्तित्व न मानणारा हा कसला राक्षसी धर्म असावा! "मला आत्मा नाही.' रामाच्या या उत्तराचा अर्थ काय? असे पहा, युरोप आणि अमेरिका येथे धर्म म्हणजे काय समजतात? धर्म म्हणजे दिवाणखान्याला शोभा आणणारी एक वस्तू आहे असे येथील लोक समजतात. "माझी स्त्री, माझी मुलेबाळे, माझी संपत्ती, माझा भव्य वाडा आहे. याशिवाय आणखी एक धर्म नावाची चीज मला हवी आहे' असे ते मानतात. सुंदर तसबिरीशिवाय दिवाणखाना शोभत नाही. तसेच आपले ऐश्वर्य खुलविण्याकरिता थोडासा धर्म पाहिजे, सर्व वस्तूंबरोबर धर्मही पाहिजे. पण आधी सर्व वस्तू (वैभव) आणि नंतर शेवटी धर्म!
काही जणांना रुचणार नाहीत असे उद्गार "रामा'च्या तोंडातून येत असतील तर त्याबद्दल तुम्ही "रामा'ला क्षमा करावी. व्यक्तीपेक्षा सत्यालाच "राम' अधिक मान देतो आणि असे करण्यात तो तुम्हाला खरा मान देतो. कारण, रामाच्यादृष्टीने तुम्ही देह किंवा अहंकार नसून सत्यस्वरुप आत्मा आहात. "सत्य' रामाकडून अशी विधाने करविते. या देशांतील लोक नेहमी प्रार्थना करीत असता ईश्वराकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? मूल आजारी पडले, मालमत्तेचे नुकसान झाले, शरीराला त्रास झाला, म्हणजे ते डोळे व हात वर करुन प्रार्थना करतात-"हे आकाशातील बापा, ईश्वरा, माझ्यावर दया कर, माझ्या संपत्तीचे व देहाचे रक्षण कर, माझ्या मुलाला बरा कर.' इत्यादी. याला धर्म म्हणावे काय?