शिल्पकार
ऐक्य समूह
Tuesday, August 31, 2010 AT 11:05 PM (IST)
एके दिवशी शंकरनंदन आपल्या शिष्याबरोबर बसले होते. त्यावेळी राज्याचा राजासुध्दा तेथे होता. अशावेळी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचे त्यांनी ठरवले आणि त्यांनी साऱ्यांना एकच प्रश्न विचारला, "तुमच्या जीवनाचे ध्येय काय आहे?' यावर निरनिराळी उत्तरे गुरुंना व राजाला ऐकावयास मिळाली. हे सर्व झाल्यावर मायणाचार्यांचा मुलगा माधवाचा नंबर आला. माधव म्हणाला, "गुरुवर्य तुमच्या प्रश्नाचे उत्तर कठीण आहे. तरी पण सांगतो. माणसाच्या मनात अहंकाराचा दर्प आहे. त्याला कुठलीही गोष्ट साध्य करणे शक्य नाही. पण ईश्वराचे रुप असलेल्या मानवाची सेवा करणे मला आवडेल. अज्ञानामुळे राष्ट्राची सध्या सुप्त झालेली शक्ती जागृत करण्यात माझे जीवन घालवावेसे वाटते. माझे जीवन, बुध्दी देशरक्षणासाठी, धर्मरक्षणासाठी अर्पण करण्याचे मी ठरविलेले आहे.' हे शब्द ऐकताच गुरुजींचा माधवबद्दलचा अभिमान दृढ झाला.त्यांनी आपल्या शिष्याला अलिंगन दिले. पुढे माधव श्री विद्यारण्य स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही लोक त्यांना कर्नाटकचे जनक म्हणून ओळखतात.
तात्पर्य : जीवनाचे ध्येय समाजहितासाठी निर्धारित करून कार्य केल्याने जीवन सार्थक होते.