Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

तोडपाणी आणि चोरवाटा
ऐक्य समूह
Monday, August 30, 2010 AT 11:11 PM (IST)
Tags: stambha lekh

 गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारणाला अचानक "तोडपाणी' संस्कृतीची जाणीव
झाली. त्याला कारणीभूत ठरले दस्तुरखुद्द कृषिमंत्री शरद पवार. त्यांनी राज्यातले विरोधक "तोडपाणी' करत असल्याची तक्रार केली. या तक्रारीला चोख उत्तर देताना विरोधकांनीही "चोराच्या चोरवाटां'चा उल्लेख केला. भारतीय राजकारणात ही संस्कृती कशी आणि कधी वाढली, याचा विचार पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनीच करायला हवा.
राजकारणात डाव-प्रतीडाव चालायचेच. अशा प्रकारचे खेळ राजकीय कार्यकर्त्यांनाच नव्हे तर सामान्य जनतेलाही अवगत झाले आहेत. कदाचित म्हणूनच राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले किंवा काहीशी अनपेक्षित टीका-टिपण्णी केली तरी त्याचे कोणाला फारसे काही वाटत नाही. राजकारणी आपल्या फायद्यासाठी कोणाला तरी पाठीशी घालणार आणि कोणाला तरी विरोध करणार, हे रोजच पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर एखाद्या राष्ट्रीय पातळीवरील  नेत्याने राजकीय भ्रष्टाचाराबाबत विधान करावे आणि सारे वातावरण ढवळून निघावे हे नोंद घेण्याजोगे. अलीकडेच अशी घटना जवळून पहायला मिळाली आणि राजकीय कुरघोडीची चुणूक पहायला मिळाल्याने क्षणभर गोंधळायला झाले. 
त्याचे झाले असे की केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राजकारणातल्या भ्रष्टाचारावर नव्याने प्रकाश टाकला आणि तसे करताना त्यांनी राजकीय तोडपाण्याबद्दल चिंता व्यक्त केली. हे करत असताना त्यांनी  विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता भूखंडाच्या व्यवहारात "तोडपाणी' केल्याचा आरोप केला. वास्तविक पाहता, पवारांनी या भानगडीत पडावे आणि भ्रष्टाचारावर घणाघात करावा, हा एक विनोदच आहे. परंतु तसा पवारांचा स्वभाव विनोदी नाही. यदाकदाचित काही विनोद केलाच तर "एका दगडात दोन पक्षी' या खासियतीनुसार त्यातसुद्धा त्यांनी कोणाचे तरी वस्त्रहरण केलेले असते. तेव्हा या भूखंडाच्या तोडपाण्याबद्दल त्यांनी केलेल्या आरोपामागे खरोखरच नेमके काय दडले आहे, याचा शोध घ्यावा लागतो. तोडपाणी केल्याबद्दल पवार नाराज आहेत आणि ते आता अशा प्रकारच्या भ्रष्टाचारावर आणि तोडपाण्यावर घणाघात घालत भ्रष्टाचार निपटून काढणार आहेत असा  याचा अर्थ नक्कीच नाही. पवार अशा प्रकारच्या "उचापती' करणाऱ्यातले नाहीत. गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असताना त्यांना भ्रष्टाचार पहायलाच मिळाला नसेल असे नाही. मात्र त्यासंदर्भात त्यांनी एखादी गंभीर टिपण्णी केल्याचे किंवा ठोस पाऊल उचलल्याचे आठवत नाही. त्यामुळे त्यांनी अस्वस्थ होण्यामागील अर्थ शोधताना काही गोष्टी आठवतात.
व्होरा समितीचा अहवाल
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत यावे यासाठी पवारांनी खूप प्रयत्न केले आहेत. परंतु खडसे काही पवारांच्या गळाला लागले नाहीत. त्याचा राग तर ते व्यक्त करत नाहीत ना, असा प्रश्न मनात येऊन जातो. बाकी तोडपाण्याचा आरोप, भ्रष्टाचार या विषयावर पवार जे काही बोलतील तो केवळ हसण्यावारी नेण्याचा भाग आहे हे सर्वांना माहीतच आहे. 1990 च्या दशकामध्ये दिल्लीमध्ये व्होरा समितीने राजकारणी आणि गुन्हेगार यांच्यातल्या हातमिळवणीबाबत बरेच काही शोधून काढले आहे. त्यामुळे त्यावर फार काही लिहायला नको. किंबहुना, 1995 मध्ये पवारांच्या विमानातून कोणी प्रवास केला होता आणि आपल्या काही मित्रांना कारागृहात फार त्रास होऊ नये यासाठी पवारांनी तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांकडे कशी रदबदली केली होती हा सारा इतिहास साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तेव्हा बिल्डर लॉबी, राजकारणी-गुन्हेगार आणि त्यांच्यातले लागेबांधे याविषयी पवार काय बोलतात, याची फार चर्चा आणि विश्लेषण न केलेले बरे. पवार म्हणतात तशी काही तोडपाणी खडसे यांनी केली असेल आणि एखाद्या निकटवर्तीयाच्या तोंडचे पाणी पळाले असेल तर त्यामुळेही पवार रागावले असण्याची शक्यता आहे. खडसे यांनी भ्रष्टाचार केला याच एका कारणासाठी पवार त्यांच्यावर नक्कीच रागावणार नाहीत. त्यांच्यावरच काय पण कोणावरच रागावणार नाहीत.
पवारांचा हितोपदेश
पवारांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे. शरद पवार हे स्वत:ला देशातले मोठे जाणते, पोक्त राजकारणी समजायला लागले आहेत आणि त्या अधिकारात आपण लोकांना हितोपदेश केला पाहिजे, असे त्यांना वाटायला लागले आहे. म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा पंचनामा करताना त्यांनी नितीन गडकरी यांचे कोणीच ऐकत नाही असेही उपहासाने म्हटले आहे. सध्याच्या राजकारणात  पवारच नव्हे तर कोणताही राजकीय नेता कोणावरही अशी टीका करू शकत नाही. कारण तो ज्या गोष्टीवरून टीका करील ती गोष्ट त्याला स्वत:लाच लागू पडण्याची शक्यता असते. आता गडकरींचे कोणी ऐकत नाहीत असे म्हणताना पवारांना आपले पुतणे अजित पवार हेसुद्धा आपले ऐकत नसतात हे नक्कीच आठवणार नाही. पण लोकांना ते आठवते. लोकसभेच्या निवडणुकीत काकांचे न ऐकता पुतण्याने कलमाडींना विरोध केला. त्यावेळी पुतण्या आपले ऐकत नसेल तर आपल्याला स्वत:ला पुण्यात कलमाडींच्या प्रचाराला जावे लागेल, असे म्हणण्याची पाळी या काकांवर आली होती. पवारांच्या पश्चिम महाराष्ट्रवादी किरकोळ पक्षात एवढे मतभेद असतील तर भाजपामध्ये गडकरी यांचे कोणी ऐकत नसेल तर त्यात नवल काय? सहा राज्यातली सरकारे भाजपाच्या हातात आहेत आणि तो पक्ष पवारांच्या पक्षापेक्षा किती तरी मोठा आहे.
याच अर्थाने पवारांनी शिवसेनेतल्या भाऊबंदकीबद्दल बोलणेही निरर्थक आहे. मात्र ही टीका करताना भाजपा आणि शिवसेना यांना कसलेही भवितव्य नाही, असेही भाकित पवार करत आहेत. यामागे कारण काय तर हे पक्ष जनतेचे प्रश्न कधी मांडतच नाहीत. वास्तविक पाहता गेल्याच महिन्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनी महागाईच्या विरोधात देशव्यापी बंद पाळला. लोकसभेत त्यावर प्रभावीपणे आवाजही उठवला. महागाई आटोक्यात आणण्यास अपयश आलेल्या पवारांच्या सरकारने संसदेमध्ये चिंता व्यक्त करणारा ठरावसुद्धा मंजूर केेला आहे. भाजपा आणि शिवसेना जनतेचे प्रश्न मांडत नसतील तर त्यांना संसदेच्या पटलावर महागाईविषयी चर्चा करण्यात यश आलेच नसते. याच महागाईवर पवार मात्र टिंगलवजा भाष्य करत आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न शरद पवारांनी कसा हाताळला आणि त्याला किती महत्व दिले हे संपूर्ण देश जाणतोच. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच सामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक भरली की तिच्यासमोर बोलताना पवारांवर आपल्या आमदारांना कानपिचक्या देण्याचे काम करावे लागते.
बिल्डर आणि राजकारणी
शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या आक्षेपावर आपले मत त्वरित व्यक्त केले. "चोराच्या वाटा चोरालाच माहीत' असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणजेच भारतीय राजकारणातल्या बऱ्याचशा चोरवाटा राजकारणी जाणून आहेत. त्या उघड केल्या जात नाहीत एवढेच. अशा वाटा उघड केल्या गेल्या तर अनेकांचे नुकसान होऊ शकते. किंबहुना, या वाटा जोपर्यंत झाकलेल्या आहेत तोपर्यंत सारे काही आलबेल असते. वाटा उघड व्हायला लागतात तसतशी राजकीय नफ्या-तोट्याची परिमाणे बदलतात. पवारांनी तोडपाण्याचा आक्षेप घेताना बिल्डर मंडळींना विरोधी पक्षाकडून त्रास होत असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचा त्रास विरोधी पक्षातली मंडळी देत असतील आणि पवारांना ते सहन करावे लागत असेल तर तो आणखी मोठा विनोद ठरावा.  राज्यकर्ते आणि प्रशासकच अशा प्रकारे गोंधळून गेले तर सामान्यजनांनी काय करायचे हे स्पष्ट व्हायला हवे. पवारांनी व्यक्त केलेली चिंता रास्त आहे. मात्र, त्याची वेळ काहीशी चुकली आहे. बिल्डर मंडळींना त्रास देण्याच्या घटना आजच सुरू झाल्या आहेत असे वाटत नाही. त्याचप्रमाणे बिल्डरांच्या जाचाला कंटाळलेले सामान्यही कमी नाहीत. मुंबईत राज्यकर्त्यांचे खास दोस्त असणारे हिरानंदानी आज अनेक तक्रारींना फाटा देत "गायब' आहेत हेही बरेच बोलके आहे. याखेरीज बिल्डर मंडळींनी पैसे अडकवून ठेवल्याच्या, वेळेत ताबा न दिल्याच्या, करार अर्धवट ठेवल्याच्या अनेक तक्रारी आयुष्यभराची बचत कामी आणणारे सामान्यजन करत आहेत. पवारांनी त्यांच्या दु:खांकडेही थोडे पहावे. आयुष्याची कमाई अडचणीत आल्याने व्यथित आलेल्यांना ज्या "तोडपाणी व्यवस्थे' ला सातत्याने सामोरे जावे लागते त्यांचाही विचार करावा. त्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणी काही बोलण्याची किंवा करण्याची वाट पाहू नये. असे झाले तर "तोडपाणी' संस्कृतीतील चोरवाटा आधी बंद होतील.
- मनोज मनोहर

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: