प्रजाहित दक्षता
ऐक्य समूह
Monday, August 30, 2010 AT 11:15 PM (IST)
करवीर नरेश राजर्षी शाहू महाराज हे प्रजाहितदक्ष राजे होते. प्रजा सुखी तर राजा सुखी. प्रजेच्या हितातच राजाचे हित आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपल्या रयतेची कोणी फसवणूक केली, लुटमार केली तर त्यांना सहन होत नसे.
एकदा शाहूराजे शिकारीसाठी पन्हाळ्याच्या जंगलात गेले होते. दुपारी विश्रांतीसाठी थांबले असता अनेक गावकरी, अधिकारी राजांना भेटावयास आले. भोजनाचा मोठा कार्यक्रम होता. महाराजांनी सर्वांच्या बरोबर भोजन केले. नंतर त्यांनी भोजनासाठी इतक्या वस्तू कोठून आणल्या याची चौकशी केली. तेव्हा त्यांना कळले की त्या भागातील गोरगरीब खेडूतांकडून या सर्व वस्तू फुकट आणल्या होत्या. हे समजताच महाराज अतिशय रागावले. त्यांना फार वाईट वाटले. त्यांना आपल्या अधिकाऱ्यांच्या या वागण्याचा अतिशय राग आला. त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांकडे पैशाची थैली फेकली व ज्यांच्याकडून या भोजनवस्तू आणल्या होत्या त्यांना ताबडतोब त्याचे पैसे देण्यास सांगितले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसाठी आज्ञा काढली. "सरकारी कामासाठी स्वत: राजा किंवा अधिकारी कोठे जातील तेव्हा बरोबर आपला शिधा घेऊन जातील. कोणत्याही परिस्थितीत रयतेची लूटमार होता कामा नये.'
तात्पर्य : प्रजा सुखी तर राजा सुखी व राज्य संपन्न असते.