Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

वेदांतावरील काही प्रश्नोत्तरे
ऐक्य समूह
Monday, August 30, 2010 AT 11:16 PM (IST)
Tags: vachnamrut

प्रथम लोकांच्या मनात येणाऱ्या सर्व प्रश्नांसंबंधी येथे हे जाहीर केले पाहिजे की, युरोपियन किंवा अमेरिकन तत्त्ववेत्त्यांपेक्षा हिंदुस्थानातील तत्त्ववेत्त्यांची विषयप्रतिपादनशैली निराळी आहे. हिंदुस्थानातील तत्त्ववेत्ते प्रथम एखाद्या विषयाचे विवेचन करतात आणि नंतर त्या विषयावरील आक्षेपांचा आणि शंकांचा विचार करतात. "रामा'ला याच मार्गाने जावे लागले आहे. नाना तऱ्हांच्या शंकांचे त्याला समाधान करुन घ्यावे लागते. पाच वर्षांचा असताना काही प्रश्न त्याला सुचले होते, पंधरा वर्षांचा असताना काही प्रश्नांनी त्याला पेचात पाडले होते आणि पंचविसाव्या वर्षी काही प्रश्न त्याच्या मनात उद्‌भवले होते. दुसरे, त्यापैकी काही प्रश्न आपल्या उन्नतीच्या प्राथमिक अवस्थेत, काही त्याहून पुढच्या म्हणजे दुय्यम अवस्थेत आणि काही त्याहून पुढील अवस्थेत उत्पन्न होणारे आहेत. समजा की, एखाद्याला भूमितीच्या पहिल्या पुस्तकातील 47 वा सिध्दांत समजून द्यावयाचा आहे. त्याला जर त्या मागील सिध्दांताचे, तसेच गृहित आणि सिध्द गोष्टी यांचे ज्ञान असेल, तर हा सिध्दांत त्याला चांगला समजून देता येईल आणि मागील सिध्दांत, गृहीत व सिध्द गोष्टी इत्यादी सर्व  त्याला अवगत नसेल, तर सिध्दांत त्याला नीट समजावून देता येणार नाही. इतकेच नव्हे, तर सर्व घोटाळा होऊन जाईल आणि काहीच सिध्द केले जाणार नाही. पध्दतशीर आण व्यवस्थित रीतीने कोणत्याही शास्त्रांचे खंडन किंवा मंडन केले पाहिजे. वेदांत हा धर्म आणि शास्त्रही आहे. युरोपमध्ये धर्म आणि शास्त्रे (भौतिक) यांमध्ये विरोध आहे.वेदांत हा धर्म, शास्त्रे आणि तत्त्वज्ञान या सर्वांचा मेळ घालतो. वेदांत हे शास्त्राचे शास्त्र असल्यामुळे संयुक्तिक आणि पध्दतशीर रीतीने त्याचे विवेचन झाले पाहिजे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: