कर्तव्यनिष्ठा
ऐक्य समूह
Sunday, August 29, 2010 AT 09:30 PM (IST)
ब्रिटिश सरकारने लोकमान्य टिळकांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून त्यांना मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे ठेवले होते. तेथेच त्यांनी रात्रंदिन वाचन, चिंतन करून जगन्मान्य गीतारहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. शिक्षा संपल्यावर ते भारतात परत आले. तुरुंगात असताना त्यांचे फार हाल झाले होते. त्यांची प्रकृती पार ढासळली होती. तशाही स्थितीत त्यांनी पुन्हा आपल्या देशकार्याला जोरात सुरुवात केली. खरे तर त्यांना आता पूर्ण विश्रांतीची गरज होती. एके दिवशी लोकमान्यांचे एक हितचिंतक त्यांना भेटाण्यास आले. लोकमान्यांची स्थिती पाहून त्यांना अतिशय काळजी वाटू लागली. ते लोकमान्यांना म्हणाले, "बळवंतराव, आता ही दगदग पुरे झाली. हे देशकार्य सोडा. दुसरा कोणीतरी ते करील. मी पाहा. सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन आता अगदी आरामात रहात आहे.'
त्यावर लोकमान्य म्हणाले, "तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे. मलाही आता ही दगदग सोसत नाही. तुम्ही निवृत्त झाल्यावर तुमच्या खुर्चीवर बसायला दुसरा मनुष्य आला. पण माझ्या या खुर्चीवर बसावयास कोण आहे? जोपर्यंत दुसरा कोणी येत नाही. तोपर्यंत मला निवृत्त कसे होता येईल? लोकमान्यांची कर्तव्यनिष्ठा व देशभक्ती पाहून ते हितचिंतक अवाक् झाले.
तात्पर्य : प्रत्येकाने आपल्या कर्तव्याबाबत दक्ष असावे.