Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

चीनची आक्रमक चाल
ऐक्य समूह
Sunday, August 29, 2010 AT 09:36 PM (IST)
Tags: Vishesh Lekh
 कम्युनिस्ट चीनचा भारताला धोका असल्याचे, समाजवादी नेते राममनोहर लोहिया सातत्याने माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना बजावत होते. पण, आपणच जागतिक शांततेचे ठेकेदार असल्याचा लौकिक मिळवायसाठी नेहरूंनी राष्ट्रहिताला तिलांजली देत, तिबेटचा घास चीनच्या घशात घातला. उत्तर सीमेशी चीनच्या सीमा भिडल्या. 1962 मध्ये याच चीनने भारतीय लष्कराचा लाजिरवाणा पराभवही केला. तरीही पं. नेहरूंनी परराष्ट्र धोरणात मूलगामी बदल केले नाहीत. त्यांच्या नंतरच्या केंद्र सरकारांनीही, जुन्याच परराष्ट्र धोरणाचा कित्ता गिरवला. परिणामी आता पाकिस्तानच्या मदतीने चीन भारताभोवतीच फास आवळायला लागला आहे.
लडाखमधील अक्साई चीन हा 30 हजार चौरस किलो मीटरचा भाग चीनने बेकायदेशीरपणे बळकावला. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील पाच हजार चौरस किलो मीटरचा भाग पाकिस्तानने चीनला परस्पर देवून टाकला. आता याच भागातून काराकोरम महामार्ग बांधून चीन खाडी राष्ट्राशी रस्त्याच्या मार्गाने वाहतूक करण्याच्या तयारीत आहे.
 गिलगिट आणि बाल्टिस्तान मधील शिया मुस्लिमांवर पाकिस्तानी सरकारचे नियंत्रण नाही. हे लोक वारंवार सरकारच्या विरोधात बंड करीत असल्याने पाकिस्तानने या भागाचे नियंत्रण चीनकडे  दिल्याचे धक्कादायक वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिध्द केले आहे. 11 हजार सैन्य तेथे आणून चीनने, गिलगिटमधल्या मुस्लिमांनाही हाकलून लावले आहे. याच भागातून चीनच्या जियांगला जोडणारा महामार्ग पूर्ण झाल्यावर पाकिस्तानातील ग्वादारपर्यंत अवघ्या 48 तासात, चिनी वाहने पोहोचू शकतील. इराणमधून थेट पाईप लाईनने गॅस आणि खनिज तेलांचा पुरवठाही चीनला होवू शकेल. अत्यंत धूर्तपणे चीनने पाकिस्तानकडून मिळवलेल्या या भागामुळे काश्मिरभोवती चीनचा फासही आपोआप आवळला जाईल. सामरिक दृष्ट्याही चीनने सुरु केलेल्या या कारवाया अमेरिकेलाही धोकादायक ठरतील.
काराकोरम महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी चिनी सैन्य प्रयत्न करीत आहे. हा मार्ग पूर्ण होताच पाकिस्तान आणि चीन दरम्यान वाहतूक सुरु होईल आणि त्याचा फायदा अफगाणिस्तानातील धर्मांध तालिबान्यांनाही होईल. पाकिस्तानचे लष्कर तालिबान्यांना सक्रिय मदत करीत असल्याचे यापूर्वी अनेकवेळा उघडकीस आले असले तरी, पाकिस्तान सरकार मात्र आम्हीच या दहशतवाद्यांशी लढत असल्याची ढोंगबाजी करते आहे.  काश्मिरमध्ये दहशतवादी घुसवायचा उद्योग पाकिस्तानने थांबवलेला नाही. चीनशी हातमिळवणी करून गिलगिट भागातून भारतीय सीमा ही सतत धगधगत ठेवायची असा पाकिस्तानचा नवा डाव असल्यानेच, चीनच्या या नव्या चालीची गंभीर दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: