जशी मती तशी गती
ऐक्य समूह
Sunday, August 29, 2010 AT 09:31 PM (IST)
मनुष्य पुन्हा बोका, कुत्रा यांच्या जन्माला जातो काय?
हे सर्व मनुष्याच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. पुढील जन्म सद्य: परिस्थितीवर अवलंबून आहे. याविषयी एक गोष्ट सांगतो. भगवान बुध्दापाशी दोन गृहस्थ आले. एकाने विचारले, "महाराज, माझ्या स्नेह्याला पुढील जन्मी कोणती गती प्राप्त होईल? हा नेहमी मनामध्ये कुत्र्याचा विचार बाळगतो आणि कुत्र्याप्रमाणे कर्म करतो. पुढील जन्मी हा कुत्रा नाही का होणार?' दुसरा म्हणाला, "महाराज, हा माझा मित्र सर्वतोपरी बोका आहे, तेव्हा पुढल्या जन्मी हा बोका नाही का होणार?' भगवान बुध्द म्हणाले, "बाबांनो, जसे तुमचे संस्कार असतील तसे तुम्हाला फल मिळेल. मात्र तुम्ही हा सिध्दांत उलटा लावत आहा. तो तुला बोका म्हणतो, तू त्याला कुत्रा म्हणतोस. परंतु विचार करा, की जो गृहस्थ आपल्या स्नेह्याला कुत्रा लेखतो त्याने आपल्या मनाने कुत्र्याचा स्वभाव पसंत केला आहे, कुत्र्याचे संस्कार तो धारण करीत चालला आहे, मरणोत्तर तो अवश्यमेव कुत्रा होईल. त्याचप्रमाणे जो आपल्या मित्राला बोका समजतो, तो स्वत:च बोका होईल. जो जशी भावना धरील तसा तो होईल. जशी मती तशी गती.
या युगात विसाव्या शतकातील सुधारणेत राहणाऱ्या मुनष्याला वेदांताचा अनुभव घेता येईल काय? वेदांताचा अनुभव घेण्यासाठी, घरादाराचा त्याग, सर्वस्वाचा त्याग करून हिमालयाच्या अरण्यात गेले पाहिजे असे कोणी सुचवितात, हे खरे
आहे काय?
- राम सांगतो, की अरण्यवास पत्करण्याचे काही कारण नाही. आम्हाला वेळ नाही, फुरसत नाही, असे लोक म्हणतात. कामधंद्यात, उद्योगात आमचा वेळ जातो, मित्र आप्तइष्ट आमचा बराच वेळ घेतात, असे हल्लीचे लोक म्हणतात, "देवा, शत्रूपासून आमचे रक्षण कर.' अशी एक प्रार्थना आहे, ती बदलून "देवा, मित्र,आप्तइष्ट यांच्यापासून आमचे रक्षण कर' अशी प्रार्थना या युगातील मनुष्याने केली पाहिजे. मित्र, आप्तइष्ट आमचा सर्व वेळ घेतात आणि त्यामुळे, चिंता, काळजी आम्हाला घेरतात.