कोकणी साहित्याचे भीष्माचार्य
ऐक्य समूह
Sunday, August 29, 2010 AT 09:37 PM (IST)
कोकणी ही गोव्याची पारंपरिक बोली भाषा. गोव्यातल्या पोर्तुगीजांच्या शतकानुशतकांच्या राजवटीत मराठी बरोबरच कोकणीचीही गळचेपी झाली. पोर्तुगीजांनी पोर्तुगीज हीच राजभाषा सक्तीची केल्यामुळे, गोमंतकियांना त्या काळात पोर्तुगीज भाषेचा आश्रय सक्तीने घ्यावा लागे. गोव्याच्या मुक्तीनंतर कोकणी भाषेने मोकळा श्वास घेतला पण, गोव्याचे स्वतंत्र राज्य झाल्यावरही या भाषेला काही राज्यभाषेचा दर्जा लवकर मिळाला नाही. तेव्हा कोकणी मातृभाषेचा अभिमान असलेले रवींद्र केळेकर रणांगणात उतरले. तीस वर्षे प्रदीर्घकाळ लढा देवून त्यांनी या भाषेला राज्यभाषेचा दर्जा मिळवून दिला. कोकणी भाषेतही सर्वोत्कृष्ट साहित्याची निर्मिती होवू शकते, हे केळेकर यांनी चौफेर ग्रंथलेखन करून सिध्दही करून दाखवले. काही लाख लोकांच्या बोलीभाषेत त्यांनी व्रतस्थपणे केलेल्या साहित्य लेखनामुळेच, कोकणी भाषेतील साहित्यासाठीच्या पहिल्या "ज्ञानपीठ', पुरस्काराचेही ते मानकरी ठरले.
दक्षिण गोव्यातल्या कुुंकळी येथे 25 मार्च 1925 रोजी जन्मलेल्या कोळेकर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पोर्तुगीज भाषेतच झाले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तरुण वयातच त्यांनी भाग घेतला. गोव्याच्या मुक्ती संग्रामातही, ज्येष्ठ समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या समवेत ते होेतेच. पोर्तुगीजांच्या तुरुंगात त्यांनी छळही सहन केला.
बरीच वर्षे ते काका कालेलकर यांच्या सहवासात होते. महात्मा गांधीजींच्या विचारांचा वारसा जपत केळेकर यांनी कोकणी-मराठीतून साहित्य लेखनाला प्रारंभ केला. दिल्लीच्या गांधी स्मारक ग्रंथालयात काही काळ ग्रंथपालाचे कामही त्यांनी केले. पण, तेथे ते काही रमले नाहीत. वर्धा येथे ते काका कालेलकर यांच्याच बरोबर सर्वोदयचे काम करीत होते. कालेलकरांचे संस्कारही त्यांच्या लेखनावर खोलवर झाले आहेत.
गांधीवादी विचारांच्या केळेकर यांना आर्थिक मोह नव्हताच, त्यामुळे साहित्य लेखन हेच आपले जीवनकार्य ठरवून ते आपल्या मायभूमीत गोव्यात परतले आणि कोकणी भाषेची सेवा त्यांनी सुरु केली. कोकणीतल्या साहित्याला वाचक वर्ग मर्यादित आहे, हे माहिती असतानाही त्यांनी जिद्दीने आपल्या मातृभाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकवायचा निर्धारही केला होता आणि तो त्यांनी शेवटालाही नेला. महात्मा, सत्याग्रह, अशेल्लो गांधीजी, हिमालयंत, वेळेवयस्को घुले, पांथस्थ यासह त्यांचे तीस ग्रंथ प्रसिध्द झाले. कोकणी भाषेला आधुनिक साहित्याचा साज चढवणारे ते या भाषेचे प्रणेतेच ठरले.
कोकणीच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी "जाग' हे मासिकही सुरु केले होते. या मासिकाचे ते शेवटपर्यंत संपादक होते. प्राचीन कोकणी साहित्याचा धांडोळाही त्यांनी घेतला होता. गुजराथी, पोर्तुगीज, इंग्रजी, फ्रेंच, मराठी, कोकणी, हिंदी आणि संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. या साऱ्या भाषात त्यांनी वृत्तपत्रीय लेखन केले. उतारवयात ते कोकणीला राज्यभाषेचा दर्जा मिळायसाठी झालेल्या आंदोलनात अग्रेसर राहिले. कोकणी भाषा हा त्यांचा प्राण आणि श्वास होता. कोकणीवर प्रेम असले तरी त्यांनी मराठी आणि अन्य भाषांचा दु:स्वास मात्र कधीही केला नाही. संपूर्ण महाभारताचा कोकणीत अनुवाद त्यांनी केला होता.
हिमालयंत या प्रवासवर्णनपर पुस्तकात त्यांनी भारतीय संस्कृतीचा शोधही घेण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणातला निसर्ग त्यांनी आपल्या साहित्यात आणला. गोमंतकीय संस्कृती आणि समाजाचेही प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात उमटले आहे. आधुनिक कोकणी साहित्याचे भीष्माचार्य, असा त्यांचा लौकिक होता. गेल्याच वर्षी "ओथांबे', या त्यांच्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. पद्मभूषण पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला होता. अनेक साहित्यिक पुरस्कारही त्यांना मिळाले होते.
आपल्या गोव्यातल्या म्हार्दोळ येथील घरात फ्रेंच, पोर्तुगीज, मराठी, इंग्रजी आणि हिंदी पुस्तकांच्या वाचनात रवींद्रबाव गर्क असत. अनेक पुरस्कार मिळाले तरीही त्यांची विनम्रता कायम होती. ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या आधी डॉ. मनोहरराय सरदेसाई यांना मिळायला हवा होता, कारण मायभूमी कोकणीची त्यांनीच माझ्यापेक्षा अधिक पूजा केली आहे, असे सांगणारा हा साहित्यिक होता. त्यांच्या निधनाने ज्ञानमंदिरातील नंदादीप शांत झाला आहे.
- वासुदेव कुलकर्णी