Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

आधुनिक कर्ण
ऐक्य समूह
Saturday, August 28, 2010 AT 12:07 AM (IST)
Tags: bodhkatha

बंगालमधील देशबंधू चित्तरंजन दास बंगाली भाषेतील मोठे लेखक होते. व्यवसायाने वकील होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे ते अत्यंत उदारचरित होते. त्यांना आधुनिक काळातील कर्ण असे म्हणत असत. त्यांच्याकडे कुणी काही मागावयास आले तर ते "नाही' म्हणत नसत. कुणालाही रिकाम्या हाती परत पाठवीत नसत.
एकदा एक गरीब ब्राह्मण त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, "माझ्या मुलीचे लग्न करावयाचे आहे. पण माझ्याजवळ पैसे नाहीत. मला आपण काही मदत कराल का?' दासबाबू कोर्टात जाण्याच्या तयारीत होते. ते म्हणाले,"ठिक आहे. मी आता कोर्टात जात आहे. संध्याकाळी मला भेटा. आज मला कोर्टात जे काही मिळेल ते मी तुम्हाला देईन.' संध्याकाळी तो ब्राह्मण दासबाबूंच्या घरी गेला. दासबाबूंनी त्याला कबूल केल्याप्रमाणे त्या दिवशीच्या केसमध्ये मिळालेली दोन हजार रुपयांची रक्कम त्या ब्राह्मणाला दिली. त्या ब्राह्मणाला खरेच वाटेना. तो म्हणाला, "साहेब, माझी थट्टा तर करीत नाही ना?'
दासबाबू म्हणाले, "छे, छे, अरे थट्टा कसली? आज तुझ्या भाग्याने मला दोन हजार रुपये मिळाले. ते तुला कबूल केल्याप्रमाणे देतो आहे. आता काही चिंता करु नकोस. आणखी काही लागले तर भेट पुन्हा.' त्या ब्राह्मणाचे डोळे पाणावले. त्याने त्या आधुनिक कर्णाच्या पायांवर डोके ठेवले.
तात्पर्य : दु:खी लोकांना मदत करणे हे सर्वात मोठे दान आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: