Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

अनिल अगरवाल
ऐक्य समूह
Saturday, August 28, 2010 AT 12:01 AM (IST)
Tags: vishesh lekh
मुकेश अंबानी हे गेली दोन वर्षे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. पण, त्यांना श्रीमंतीचा वारसा त्यांचे वडील धीरुभाई अंबानी यांच्याकडून मिळालेला होता. आता मुकेश अंबानी यांना मागे टाकून अनिल अगरवाल हे देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती झाले, ते त्यांच्या स्वत:च्या कर्तृत्व आणि जिद्दीच्या बळावर! मुकेश अंबानी यांच्या कुटुंबांच्या संपत्तीचे बाजारातले मूल्य 1 लाख 45 हजार 275 कोटी रुपये आहे तर अगरवाल यांच्या वेदांत समूहाच्या समभागाचे मूल्य 2 लाख 33 हजार 713 कोटी रुपये आहे. अवघ्या सहाच महिन्यांपूर्वी "फोर्ब्ज' या नियतकालिकाने जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत अगरवाल भारतात दहाव्या क्रमांकावर होते. त्यांनी अलिकडेच तेल क्षेत्रातील "केर्न इंडिया' या कंपनीचे 61 टक्के समभाग 9.6 अब्ज डॉलर्सना खरेदी करायचा निर्णय घेतल्यामुळे, त्यांची कंपनी आता ऍल्युमिनियम, धातू आणि खाणकामाच्या क्षेत्रातली जगातील आघाडीवर असलेली कंपनी झाली आहे. स्टरलाईट, हिंदुस्थान झिंक, सेसा गोवा आणि वेदांत रिसोर्सेस या कंपन्यांबरोबरच केर्न इंडिया, या कंपनीची मालकीही अगरवाल यांच्याकडेच असेल. अंबानी समूहाच्या रिलायन्सशी, तेल उत्पादनाच्या क्षेत्रात त्यांची कंपनी टक्कर देईल.
बिहारची राजधानी पाटणा शहरात 1954 मध्ये जन्मलेल्या अनिल यांचे वडील हे छोटे उद्योजक होते. ते ऍल्युमिनियमचे सुटे भाग आपल्या कारखान्यात तयार करीत. पाटण्याच्या मिलर हायस्कूलमध्ये अनिल अगरवाल शिकत होते तेव्हा, बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे त्यांचे वर्गमित्र होते. पाटणा सोडून अनिल अगरवाल मुंबईला आले आणि त्यांनी भंगार विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 1976 मध्ये स्टरलाईट इंडस्ट्रिजची त्यांनी धाडसाने स्थापना केली. 1986 मध्ये वेदांत रिसोर्सेस या कंपनीची स्थापना केल्यावर त्यांनी उद्योग क्षेत्रात कधीच मागे वळून पाहिले नाही. वयाच्या 31 व्या वर्षी ते भारतातील आघाडीचे उद्योजक होते. स्टरलाईट टेक्नॉलॉजीस लि., स्टरलाईट ऑप्टिकल टेक्नॉलॉजीस लि., या कंपन्यांची त्यांनी स्थापना केली. भारत ऍल्युमिनियम कंपनी ताब्यात घेतल्यावर अनिल अगरवाल यांनी स्टरलाईट गोल्ड लि., ही कंपनीही सुरू केली. ऍल्युमिनियम, तांबे, सोने आणि अन्य धातूंच्या उत्पादनात झेप घेतल्यावर त्यांनी खाण उद्योगातही प्रवेश केला. देशातल्या अनेक खाणीही त्यांनी विकत घेतल्या. 2006 मध्ये त्यांची संपत्ती 12 अब्ज डॉलर्स इतकी होती.
वेदांत उद्योग समूहाने विविध उद्योगात झपाट्याने यश मिळवले असले तरी, खाण उद्योगात मात्र सरकारच्या अनेक नियमांचे राजरोसपणे उल्लंघन केल्याची टिकाही होत आहे. ओरिसातल्या नियामगिरी विभागातल्या बॉक्साईटच्या खाणीला अलिकडेच केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी परवानगी नाकारल्यामुळे अनिल अगरवाल टिकेच्या मोहळात सापडले आहेत. शून्यातून छोट्या उद्योगाचा प्रारंभ करुन, जगातले अग्रक्रमाचे उद्योजक होण्याची किमया त्यांनी, आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि अपार परिश्रमाच्या जोरावर करुन दाखवली. इंग्लंड, अमेरिका आणि इंडोनेशिया येथेही त्यांच्या उद्योग समूहाचे कारखाने आहेत.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: