Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

भाजपचे "मिशन पश्चिम महाराष्ट्र' रुसले
ऐक्य समूह
Saturday, August 28, 2010 AT 12:03 AM (IST)
Tags: stambhalekh

पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा जनाधार मिळत असल्याचा हायटेक प्रचार करत भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीसह "मिशन पश्चिम महाराष्ट्र' कोल्हापुरात पार पडले. आ. चंद्रकांतदादा पाटील, आ. सुरेश हळदणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचतारांकित दर्जाच्या सुविधांसह पाहुण्यांची बडदास्त चोख ठेवली. त्यामुळे ऐन श्रावण महिन्यामध्ये खास कोल्हापुरी तांबडा, पांढऱ्या रस्स्यासह सामिष आहारावर ताव मारण्याचा मोह अनेकांना आवरता आला नाही. हे मिशन प्रचारकी थाटाचे हायटेक जरूर झाले मात्र त्यामागील मूळ उद्देश साध्य झाला नाही.
भारतीय जनता पक्ष या राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची तीन दिवसांची बैठक तब्बल सुमारे तीस वर्षांच्या कालावधीनंतर नुकतीच कोल्हापूर येथे पार पडली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रामधून भाजपचे पाच आमदार निवडून आले त्यामुळे या परिसरात पक्षाच्या दृष्टीने अनुकूल उत्साहजनक वातावरण निर्माण झालेले आहे. मोठा जनाधार लाभत आहे. त्याचा पुरेपूर लाभ उठवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजपने "मिशन पश्चिम महाराष्ट्र' ही योजना आखली आहे. अनेक मान्यवर व वजनदार नेते, मोहरे भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, अशी दवंडी पिटली गेली. सर्वच प्रचार यंत्रणांचा "आधार' घेत सर्वदूर आपल्या योजनांचा प्रचार करण्यात "हायटेक' बनलेल्या भाजपचा अन्य कोणताही राजकीय पक्ष हात धरू शकणार नाही. या पध्दतीने "मिशन पश्चिम महाराष्ट्र' ची प्रचार व प्रसार मोहीम राबवली गेली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, माजी अध्यक्ष व्यंकय्या नायडू, खा. गोपीनाथ मुंडे, पक्ष प्रवक्ते खा. प्रकाश जावडेकर, विधान सभेतील विरोधी पक्षनेते आ. एकनाथराव खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आ. पांडुरंग कुंडकर, नागपूरचे युवा आ. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष सुधीर मनगुंटीवार, प्रदेश सरचिटणीस विनोद तावडे आदी मान्यवर नेते मंडळी या निमित्ताने कोल्हापूर येथे आली.
शिक्षण सम्राटांना झोडपले
पश्चिम महाराष्ट्रातील जनतेने अनेक नेत्यांना आणि विविध पक्षांना संधी दिली. मात्र येथील सामान्य माणसाचा विकास झाला नाही. काही साखर सम्राट झाले, काही दूध सम्राट झाले तर काही शिक्षण सम्राट झाले व काही होत आहेत. या सम्राटांचे साम्राज्य चांगल्या पध्दतीने, बरकतीमध्ये सुरु आहे पण रयत गरीबच राहिली. तिला कोणी आश्वासक "वाली' राहिला नाही. इंजिनिअरिंग व मेडिकल महाविद्यालयांची शेती जोमात सुरु आहे. तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आपले जीवन संपवत आहेत हे दुष्टचक्र केव्हा थांबणार? आता भाजपपुढे हे दुष्टचक्र थांबवण्याचे आव्हान उभे ठाकलेले आहे. ते आम्ही निश्चितच थांबवू असा विश्वास व्यक्त करून राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी वाढलेल्या भाजपने आता पश्चिम महाराष्ट्रावर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे.
पहिल्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नितीन गडकरी यांचा गौरव सोहळा प्रायव्हेट हायस्कूलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी भव्य, आकर्षक शामियाना उभारण्यात आला होता. पण दुपारी चारच्या सुमारास पावसाने जोरदार झोडपण्यास सुरुवात केल्याने शामियान्याला छोट्या तळ्याचे स्वरुप आले. कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शर्थ करून चर काढून साठलेले पाणी बाहेर काढण्यात यश मिळवले, त्यामध्ये बराच वेळ गेला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा अधिक वेळाने मंडपावरून पडणारे पावसाचे पाणी आणि क्रीडांगणावर झालेली दलदल अशा वातावरणातच हा गौरव सोहळा सुरु झाला. नितीन गडकरी यांना एक कोटी रुपयांचा गौरव निधी प्रदान करण्यात आला. त्यांनी या एक कोटीच्या निधीमध्ये पक्षाच्यावतीने तितकाच एक कोटी रुपयांचा निधी घालून त्यापैकी एक कोटी रुपये महानगर भाजपला आणि एक कोटी रुपये ग्रामीण कोल्हापूरला त्यांच्या कार्यासाठी देण्याची घोषणा केली. महानगर व ग्रामीण कोल्हापूर भाजपला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याच्या घोषणेने स्थानिक नेते व कार्यकर्ते सुखावले.
शिक्षणाचा बाजार मांडून स्वत:च्या घराची तुंबडी भरणाऱ्या राज्यामधील शिक्षण सम्राटांना धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल अशी घोषणा करून नितीन गडकरी यांनी देशामध्ये भाजपची सत्ता असलेल्या आठ राज्यांमध्ये शेतकऱ्यांना तीन टक्के व्याज दराने कर्ज देण्यात येणार आहे. त्याची सुरुवात कर्नाटक व मध्य प्रदेशमध्ये झालेली आहे पण महाराष्ट्रात हा व्याज दर अकरा टक्के आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत तर दुसरीकडे उद्योगपतींची सोळाशे  कोटींची कर्जे केवळ सहाशे कोटी रुपये "एकरकमी' भरून घेतली आहेत, असा आरोप केला.
सीमा प्रश्नावर गुळूमुळू भूमिका
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. सध्या कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आहे. या शासनाकडून सीमा भागातील मराठी भाषिक बांधवांवर गेले काही महिने सातत्याने अन्याय, अत्याचार, पिळवणूक सुरु आहे. त्याविरुध्द कोल्हापूरची जनता सदैव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागे ठामपणे उभी राहून आपल्यापरीने सर्वतोपरी आंदोलने करत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने नितीन गडकरी हे त्यांच्या पक्षाच्या कर्नाटक सरकारला काही "खडे बोल' सुनावतील अशी जनतेची अपेक्षा होती. "दोन राज्यांमध्ये जेव्हा वाद सुरु होतो तेव्हा तो सोडवण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे. त्यांनी सर्व संबंधितांची बैठक घेवून सामंजस्याने हा प्रश्न सुटावा यासाठी भाजप सर्वतोपरी सहकार्य करेल' असे पंतप्रधानांच्या कोर्टात चेंडू टाकण्याचे उत्तर गडकरी यांनी दिले. महाराष्ट्रातील भाजप सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी आपल्या पक्षाच्या कर्नाटका-तील सरकारबद्दल एक अवाक्षरही न बोलता सोयीस्कर "पळवाट' शोधली.
राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरी आणि लोकसभेतील भाजपचे उपनेते खा. गोपीनाथ मुंडे या दोन 'दिग्गज' नेत्यांमधील "सख्य' सर्वांनाच माहिती झालेले आहे. "मिशन पश्चिम महाराष्ट्र' साठी पहिल्या दिवशी गडकरी व अखेरच्या तिसऱ्या दिवशी खा. मुंडे अशी योजना "संसदेचे अधिवेशन सुरु असल्याच्या' नावाखाली करण्यात आली होती. "केंद्र शासनाच्या धरसोड वृत्तीमुळे सशक्त साखर उद्योग आर्थिक अरिष्टात सापडला असल्याने पुढील हंगामात गेल्या हंगामाएवढा उसाला दर देणे शक्य होणार नाही. त्यामुळे साखर उद्योग नियंत्रणमुक्त करावा' अशी आग्रही मागणी खा. मुंडे यांनी करून "साखर उद्योग वाचला नाही तर विदर्भ, मराठवाड्याप्रमाणे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल' अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. "सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मूठमाती दिल्याने सर्वच आघाड्यांवर केंद्रामधील सरकार अपयशी ठरले आहे.'अशी टीका करून "सर्वसामान्यांच्या प्रश्नावर भाजप रान उठवेल तेव्हा कॉंग्रेस व राष्ट्रवादीची राज्यातील भ्रष्ट राजवट उलथून टाकण्याचे' आवाहन त्यांनी केले. ना. शरद पवार व ना. अजित पवार हे दोघेही काका-पुतणे पवार आता जनतेला नको आहेत' असा टोलाही खा. मुंडे यांनी लगावला.
महापालिका निवडणुकीत युती
मिशन पश्चिम महाराष्ट्रमध्ये या परिसरातील मान्यवर, बडे नेते भाजपमध्ये दाखल होणार अशी दवंडी पिटण्यात आली होती. मात्र कोल्हापूरचे रामभाऊ चव्हाण व इचलकरंजीचे पुंडलिक जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीच भाजपमध्ये प्रवेश केला. हे दोघेही युतीमधील शिवसेनेचे माजी पदाधिकारी असून गेल्या काही महिन्यांपासून ते शिवसेनेपासून "दुरावले' होते. खुद्द भाजपपासून दुरावलेले माजी जिल्हाध्यक्ष सुभाष वोरा, माजी प्रदेश उपाध्यक्ष कर्नल शंकरराव निकम, माजी आमदार प्रा. सुभाष दाबके अशी अनेक नामवंत मंडळी आहेत. मात्र या मंडळींशी संपर्क साधून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सक्रिय करण्याबाबत प्रयत्न झाला नाही. कोल्हापूर महापालिकेवर आगामी निवडणुकीमध्ये युतीचा झेंडा फडकवावा असे आवाहन प्रदेश अध्यक्ष सुधीर मनगुंटीवार यांनी केले. गेल्या तीस वर्षामध्ये महापालिकेमध्ये भाजप नगरसेवकांची संख्या दोनहून अधिक आजवर गेलेली नसल्याचे त्यांना कदाचित माहिती नसावे. शिवसेनेच्या बरोबर युती केल्यास भाजपला काही मोजक्याच जागा देण्यास शिवसेना पदाधिकारी तयार आहेत, हे
वास्तव आहे.

कोल्हापूर वार्तापत्र
राजीव वाबळे
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: