पापांचे मूळ
ऐक्य समूह
Saturday, August 28, 2010 AT 11:16 PM (IST)
क्षुद्र वासना, आनुवंशिक समजले जाणारे रोग याविषयींचा खुलासा समजला. पण, क्षयरोग हा वासनांमुळे कसा उत्पन्न होतो हे समजत नाही. आमच्या भुकेचा, अन्नाकांक्षेचा तर तो परिणाम नसेल ना?
वेदांताप्रमाणे, अत्याहार आणि अजीर्ण, उद्वेग किंवा विषाद उत्पन्न करणाऱ्या अन्नाचे सेवन, हेच सर्व पापांचे मूळ आहे. अजीर्णाच्या विकारामुळे, तुम्ही रागावता आणि सर्व प्रकारची पापे करण्यास प्रवृत्त होता. तुमचा आनंद कमी करणारी कोणतीही गोष्ट वेदांतदृष्ट्या पाप आहे. सर्व पापांचा उगम विशेषत: अन्नापासून, अन्नाच्या अयोग्य सेवनापासून होतो. इतर धर्माचे लोक या गोष्टीला-मुद्याला-रामाइतके महत्व देत नाहीत. पण, ती गोष्ट सत्य आहे. स्वत:च्या आणि इतर प्रियमित्रांच्या अनुभवावरुन "राम' तुम्हाला असे सांगतो की, जर आमचे जठर सुस्थितीत असेल आणि आम्ही चांगले निरोगी असू तर आमचा कामक्रोध, आमचे मनोविकार, आमच्या वासना ताब्यात ठेवता येतात.
जेव्हा तुमचे जठर, शरीर, निरोगी असते, तेव्हा तुमचे शील उत्तम असते आणि तुम्ही मोहाला दाद देत नाही, पण उद्या तुमचे जठर सुस्थितीत नसले, तुमच्या देहाला काही विकार जडला म्हणजे य:कश्चित गोष्टीने तुमची शांती बिघडून जाते, तुम्ही त्रस्त होता. यासाठी जे अन्न सेवन करता त्याची काळजी घ्या म्हणजे तुमचे विकार बरे होतील.
अत्याहार, अयोग्य अन्नसेवन हे सर्व पापांचे मूळ आहे. अशा प्रवृत्तीचा मनुष्य वेदांतदृष्ट्या सप्त महापातके पाप्यासारखा आहे. जठरावर आमची आसक्ती असली म्हणजे, आम्हाला असे (रोगी) देह प्राप्त होतात.
या विषयाचा विचार करणे कमीपणाचे आहे असे बहुतेक धर्माचे लोक समजतात. हे विलक्षण आहे.