Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

श्रध्देचा विषय
ऐक्य समूह
Saturday, August 28, 2010 AT 11:15 PM (IST)
Tags: bodhkatha

एकदा एक सज्जन मनुष्य आपल्या नास्तिक मित्राबरोबर नाशिकला गेला. तेथे गोदावरीच्या पाण्यात उभा राहून तो आपल्या स्वर्गस्थ पितरांना जलांजली देऊ लागला. ते पाहून हसू आलेल्या त्याच्या नास्तिक मित्राने त्याला विचारले, "अरे, हे तू काय करीत आहेस?' तो सज्जन म्हणाला, "मी माझ्या स्वर्गातील पितरांना जलांजली देत आहे?' हे ऐकून तो नास्तिक मित्र म्हणाला, "अरे, तू आहेस येथे पृथ्वीवर आणि तुझे पितर आहेत स्वर्गात! मग तू दिलेले पाणी स्वर्गातील पितरांना कसे मिळणार? काही तरी वेडेपणा आहे.' त्यावर तो सज्जन काहीच बोलला नाही. पितरांना जलांजली देऊन झाल्यावर त्याने आपल्या मित्राच्या वडिलांना शिव्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे रागावलेला तो नास्तिक मित्र म्हणाला, "माझ्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही म्हणून तू माझ्या वडिलांची निंदानालस्ती करतो आहेस.' त्यावर तो सज्जन मित्र शांतपणे म्हणाला, "मी दिलेली जलांजली स्वर्गातल्या पितरांना मिळणार नाही हे जर खरे तर मी येथे दिलेल्या शिव्या तुझ्या वडिलांच्यापर्यंत कशा जातील? तेव्हा राग मानू नकोस? मी केले ते सर्व मनाच्या समाधानासाठी. हा सगळा भावनेचा, श्रध्देचा विषय आहे.' नास्तिकाला ते पटले. तो शांत झाला.    
तात्पर्य : श्रध्दा असावी, अंधश्रध्दा असू नये.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: