सुवर्णमयी मोहक स्मृती
ऐक्य समूह
Friday, August 27, 2010 AT 11:59 PM (IST)
ओ जाने वाले, हो सके तो
लौट के आना।।
अशी आर्त साद घालणारा गायक मुकेश काळाच्या पडद्याआड गेला, त्याला 35 वर्षे झाली. काळ कुणासाठी कधी थांबत नाही, पण, जिवंतपणी त्या माणसाने जे काही मिळवले आणि भरभरून दिले, त्या आठवणी, त्याचे कर्तृत्व मात्र चिरंतन राहते. गायक मुकेश हा त्यातलाच! हिंदी चित्रपटसृष्टीतली त्याची कारकिर्द अवघी 30 वर्षांची. या काळात त्याने पार्श्वगायन केलेल्या गाण्यांची संख्याही तशी महंमद रफी, किशोर कुमार या गायकांसारखी हजारोंच्या संख्येत नाही. मुकेशने अवघी हजारभर गाणी गायली असतील. पण जन्मजात मिळालेल्या गोड, सोनेरी आवाजाने त्याने गायलेल्या प्रत्येक गाण्याचे अक्षरश: सोने केले. नौशाद, लक्ष्मीकांत प्यारेलाल, खैय्याम, शंकर जयकिशन, अनिल विश्वास, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, सलिल चौधरी, रवी यांसह ज्या संगीतकारांच्याकडे तो गायला, ही सारी गाणी अविस्मरणीय ठरली. 35 वर्षांनीही मुकेशने गायलेल्या गाण्यांचे विस्मरण श्रोत्यांना झालेले नाही, हेच त्याच्या गायनाचे खरे
यश होय!
मुकेशचा जन्म दिल्लीचा. मुकेश चंद्र कपूर हे त्याचे पूर्ण नाव. 22 जुलै 1923 हा त्याचा जन्मदिवस. शाळेत शिकायला लागल्या-पासूनच त्याला गाण्याचे नव्हे, तर अभिनयाचे प्रचंड वेड होते. चेहराही अभिनेत्याला अनुरुप होता. आपण मुंबईला हिंदी चित्रपटसृष्टीत जायचे आणि अभिनेताच व्हायचे, असे स्वप्न युवक मुकेश पहात होता. अभिनेते मोतीलाल हे त्याचे नातेवाईक. त्यांच्या बहिणीच्या विवाह सोहळ्यात मुकेशने हौसेने गायलेले गाणे त्यांना विलक्षण आवडले. त्यांनीच त्याला मुंबईच्या आपल्या घरी आणले. पं. जगन्नाथ यांच्याकडे तो शास्त्रीय संगीताचा रियाजही करायला लागला. जगन्नाथजींनी त्याच्या मधुर आवाजाला पैलू पाडले. त्याचा आवाज फिरता राहील, अशा चिजा शिकवल्या. मुकेश शास्त्रीय गाणीही गायला लागला. पण, त्याचे अभिनेता व्हायचे वेड मात्र काही सुटले नाही. 1941 मध्ये निर्दोष या चित्रपटात त्याने पहिली भूमिका केली. हा चित्रपट साफ कोसळला. त्याचे स्वप्न साकार व्हायच्या आधीच संपले. त्यानंतर माशुका आणि अनुराग या दोन चित्रपटात त्याने भूमिका केल्या. पण तेही चित्रपट काही चालले नाहीत. आपल्याला या मायानगरीत अभिनेता म्हणून यश मिळणार नाही, अशी खूणगाठ त्याने बांधली आणि राजबिंड्या चेहऱ्याचा अभिनेता मुकेशची, अभिनयाची कारकिर्द कायमची संपली. याच चित्रपटांनी त्याची आर्थिक स्थितीही खालावली होती.
1945 मध्ये मोतीलालच्याच "पेहली नशा', या चित्रपटात त्याने पहिले गाणे गायले. राजकपूरच्या अंदाज आणि आग या चित्रपटातल्या गायलेल्या गाण्यांनी त्याला अफाट लोकप्रियता मिळाली. आवारा, अनाडी, संगम, मेरा नाम जोकर, जिस देशमें गंगा बहती हैं। या राजकपूरच्या चित्रपटातली त्याने गायलेली सारीच गाणी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.
यहुदी, मधुमती, बंदिनी, रजनीगंधा, परवरीश, संबंध, अनोखी रात, अंदाज, पूरब पश्चिम या चित्रपटातली मुकेशने गायलेली गाणी रसिकांच्या ओठावर कितीतरी वर्षे रेंगाळली होती. त्याने गायलेल्या प्रत्येक गाण्याचे अक्षरश: सोने झाले. फिल्मफेअर पुरस्कारही त्याला मिळाले.
आ लौट कें आजा मेरे गीत। (रानी रुपमती), सब कुछ सिखा हमनें, ना सिखी होशियारी। (अनाडी), भुली हुईं यादों, मुझें कितना ना सतावों, चल अकेला (संबंध), सारंगा तेरी यादमें (सारंगा), दिल जलता हैं तो जलनें दो, कोई जब तुम्हारा, हृदय तोड दे (पूरब पश्चिम), डमडम डिगा डिगा, छलिया मेरा नाम, हमनें तुमकों प्यार दिया हैं कितना (दुल्हा-दुल्हन), मैं हरपल का भी शायर हूॅूं, मॉंझी नैय्या ढूँढे किनारा (उपहार), झूम झूम के नाचा आज (अंदाज), ओहरे ताल मिले, नदीकें जलमें (अनोखी रात) सुहाना सफर और मौसम हॅंसी (मधुमती), कही दूर जब दिन ढल जाए (आनंद), ओ मेहबूबा (संगम) अशी मुकेशची गाणी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सुवर्णमयी संगीताचा स्मृतीगंध देतात. अमेरिकेत 27 ऑगस्ट रोजी डेट्रॉईटमध्ये गाण्याला गेलेले असताना त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला आणि त्यातच रसिकांचा हा लाडका गायक, हे विश्व कायमचे सोडून निघून गेला.
- वासुदेव कुलकर्णी