Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

अपयशाने खचू नये
ऐक्य समूह
Thursday, August 26, 2010 AT 11:03 PM (IST)
Tags: bodhkatha

थोर शास्त्रज्ञ एडिसन वीस-वीस तास संशोधनाचे काम करीत असत. मानव प्राणी सुखी करणे हे त्यांचे ध्येय होते. ग्रामोफोनचा शोध त्यांनीच लावला. कंटाळा असा त्यांना माहितच नव्हता. निराशा हा शब्दच त्यांना आवडत नसे. तहान-भूक याचे त्यांना भानच नव्हते. दिवस कधी संपतो, रात्र कधी सुरु होते याकडे त्यांचे लक्ष नसे. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ते म्हणाले होते, "मी अजून शंभर वर्षे संशोधन कार्य करीन. त्यासाठी हजारो विषय माझ्या डोक्यात आहेत.' ते कधीही घड्याळ वापरीत नसत. घड्याळाकडे पाहून जो काम करतो त्याच्या हातून चांगले काम होत नाही असे त्यांचे मत होते. अखंड मन लावून जो काम करतो तोच जीवनात यशस्वी होतो असे ते सांगत असत. संशोधन कार्यात त्यांना अनेक वेळा अपयश आले पण निराश न होता ते अधिक उत्साहाने काम करीत असत. त्यांनी रबरावर खूप संशोधन केले. हजारो प्रयोग केले. त्यांच्याबरोबर काम करणारा त्यांचा सहकारी निराश झाला होता. "निष्पत्ती जर काहीच होत नसेल तर या प्रयोगांना काय अर्थ?' असे तो म्हणाला असता एडिसन म्हणाले, "हे हजारो प्रयोग कारणी लागले आहेतच. इतके घटक वापरले पण त्यातून आपल्याला रबर मिळणार नाही हे समजले हे मोठेच काम नाही का? आपण निराळा घटक वापरू. अपयशाने निराश होता कामा नये.'
तात्पर्य : अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: