Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

न्यूयॉर्कमध्ये दहशतवादी ....
ऐक्य समूह
Thursday, August 26, 2010 AT 10:59 PM (IST)
Tags: lolak

अमेरिकेची आर्थिक राजधानी असलेलं न्यूयॉर्क महानगर गेले तीन आठवडे दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं पुरतं घाबरुन गेलं आहे. जंग जंग पछाडूनही पोलीस खाते, महापालिका आणि अमेरिकन प्रशासनालाही या दहशतवाद्यांचा हल्ला अद्याप पूर्णपणे रोखता आलेला नाही. उलट एका भागातल्या दहशतवाद्यांच्या टोळीचा नायनाट करताच, अवघ्या दोन तीन दिवसांत हे दहशतवादी दुसऱ्या भागावर तुफान हल्ला चढवतात. या दहशतवाद्यांच्या भितीनं न्यूयॉर्कमधलं सामान्य जनजीवन तर विस्कळीत झालंच, पण त्यांच्या भितीनं चित्रपटगृहं, दुकानं, मॉल्स, कपड्यांची दुकानंही ओस पडायला लागली. एखादा दहशतवादीही या शहरात गुप्तहेर पोलिसांची नजर चुकवून घुसू शकत नाही. घुसलाच तर त्याला तात्काळ गजाआड करण्याइतका प्रचंड बंदोबस्तही पोलिसांनी ठेवलेला असतानाही, हे दहशतवादी प्रचंड संख्येनं शहरात घुसलेच कसे? आणि त्यांचा शोध घ्यायला पोलीस खातं अपयशी कसं ठरतं आहे, हे न्यूयॉर्कवासियांनाही समजेनासं झालं आहे.
2 सप्टेंबर 2002 रोजी अल्‌ कायदाच्या आत्मघातकी दहशतवाद्यांनी विमानं पळवून ती, न्यूयॉर्कमधल्या विश्व व्यापार केंद्रावर धडकवली. प्रचंड विध्वंस झाला. शेकडो निष्पापांचे बळी गेले. या महासंहारानं हादरलेल्या आणि जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनं जगातला इस्लामी दहशतवाद पूर्णपणे नष्ट करायची प्रतिज्ञा केली. इराक आणि अफगाणिस्तानातल्या धर्मांधांच्या राजवटीत युद्धाच्या मार्गानं उलथवून टाकल्या. संपूर्ण अमेरिकेतल्या पोलीस यंत्रणेची पुनर्रचना केली. विमानं, रेल्वे आणि अन्य वाहतुकीच्या यंत्रणेवर गुप्तहेर खात्यानं कडक नजर ठेवली. परदेशातनं येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून झडती घ्यायचं सत्र सुरू झालं. साधी चिमणीही गुप्तहेर खात्याच्या पोलिसांची नजर चुकवून अमेरिकेत प्रवेश करू शकत नाही, इतकी अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था अमेरिकन प्रशासनानं निर्माण केल्यानंच, अल्‌ कायदाच्या "त्या' हल्ल्यानंतर एकही दहशतवादी घटना अमेरिकेत घडलेली नाही आणि घडवायचं धाडस दहशतवाद्यांनाही झालेलं नाही. तरीही या हजारो दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांच्या डोळ्यात धूळ फेकून न्यूयॉर्क शहरात प्रवेश केला आणि सर्व भागात सुरक्षित आश्रयही घेतला. या दहशतवाद्यांनी राजरोसपणे शहरवासियांवर, पोलिसांवर, गुप्तचर यंत्रणांवर आणि प्रशासनावर राजरोसपणे भरदिवसा-रात्री हल्ले चढवायचं सत्र सुरू केल्यानं, न्यूयॉर्क वासियांची झोप अक्षरश: उडाली आहे.
साऱ्या प्रशासनाला हैराण करणारे, शहरवासियांना संत्रस्त करणारे हे दहशतवादी आहेत, "ढेकूण!' 1990 मध्ये न्यूयॉर्कवर ढेकणांनी हल्ला चढवला तेव्हा, साऱ्या शहरात किटकनाशकांची फवारणी करुन त्यांचा नाश करण्यात प्रशासन यशस्वी झालं होतं. त्यानंतर तब्बल 20 वर्षांनी, ढेकणांनी गुपचूपपणे हा दुसरा हल्ला चढवला आहे. महिन्यापूर्वी काही चित्रपटगृहात ढेकणांनी तळ ठोकल्याचं आढळलं. अवघ्या पंधरा दिवसात न्यूयॉर्कचं वैभव असलेल्या "एम्पायर स्टेट बिल्डिंग', मधल्या साऱ्या कार्यालयात ढेकणांच्या टोळ्या घुसल्या. चित्रपटगृहं, सरकारी कार्यालयं, कापडांची दुकानं, मॉल्स आणि अन्य व्यापारी संस्थांतही ढेकणांच्या टोळया घुसल्याचं आढळलं. न्यूयॉर्क टाईम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट ही अमेरिकन प्रशासनाला हादरवणारी वृत्तपत्रांची कार्यालयंही या दहशतवाद्यांच्या तडाख्यातून सुटलेली नाहीत. विद्यापीठ, महापालिका, महाविद्यालयं इथंही ढेकणांच्या टोळ्या घुसलेल्या आहेतच. काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात बसलेले प्रेक्षक अवघ्या अर्ध्या तासात ढेकूण चावायला लागल्यानं, उठून बाहेर पडले. त्यानंतर चित्रपटगृहं, नाट्यगृहं ओस पडायला लागली. ढेकणांच्या भितीनं मॉल्स आणि दुकानात जायचं धाडस लोक करेनासे झाले. फर्निचरच्या दुकानात तर गिऱ्हाईकच नाही. लॉजिंगमध्ये उतरायचं धाडस बाहेरचे प्रवासी करीत नाहीत. संपूर्ण न्यूयॉर्क शहरावर ढेकणांनी अशी आपली दहशत निर्माण केल्यानं महापालिकाही हवालदिल झाली. वृत्तपत्रं, उपग्रह वाहिन्या, सामाजिक संस्था, महापालिकेनं आता ढेकणांचा नाश कसा करायचा, ढेकणांना प्रतिबंध कसा करायचा, ढेकूण चावल्यास काय करायचं, ढेकणांचा प्रसार कसा रोखायचा, याविषयी जनजागरणाची व्यापक मोहीमच सुरू केली आहे. शहरातली ढेकूणग्रस्त घरं आणि व्यापारी संस्था, चित्रपटगृहं, दुकानात ढेकूण नाशक औषधांची फवारणी करायचं कामही अक्षरश: युद्धपातळीवर सुरु आहे. पण, अद्यापही न्यूयॉर्क शहर ढेकूणमुक्त झालेलं नाही. एवढी मोठी जागतिक महासत्ता असलेली अमेरिका ढेकणांच्या
हल्ल्यानं अशी हादरली आहे.
- वासुदेव कुलकर्णी
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: