सूक्ष्म शरीराची प्रगती
ऐक्य समूह
Thursday, August 26, 2010 AT 11:02 PM (IST)
सद्गुण आणि दुर्गुण यातील भेद किंवा याची मर्यादा काय आहे हे कृपा करुन सांगा.
वेदांताप्रमाणे सद्गुण व दुर्गुण हे सापेक्ष शब्द आहेत. येथे अमुक ठिकाणी दुर्गुण संपतो आणि सद्गुण सुरु होतो, असे तुम्हाला नक्की सांगता येत नाही. एक शिडी किंवा सोपान आहे असे समजा. त्यावरुन तुम्ही वर गेला की तो सद्गुण, खाली आला की तो दुर्गुण. कोणत्याही एका विशिष्ट क्रियेने तुम्ही वर सत्याप्रत जात असला, तुमची उन्नती होत असली म्हणजे तो सद्गुण, पण कोणत्याही क्रियेने तुम्ही खाली-सत्यापासून दूर जात असला, म्हणजे तो दुुर्गुण. वैवाहिक स्थितीसंबंधाने जर तुम्ही विश्वव्यापी प्रेम, सर्वव्यापी चैतन्य याच्या समीप जात असला तर तो संबंध धर्म्य व पुण्यकारक आहे, पण वैवाहिक संबंधाने जर तुम्ही खाली, परमात्म्यापासून दूर जात असला, तर तो संबंध अधर्म्य व पापकारक आहे.
वेदांताप्रमाणे, प्रत्येकाला ऐहिक वासनांतून, पशुवृत्तीतून गेले पाहिजे. कर्मतत्व असेच आहे. उत्क्रांती तत्त्वाप्रमाणे सर्व लोक पुढे पुढे जात आहेत. लांडगे कुत्रे, वाघ इत्यादी पशूंचे देह सोडून मानवी देह धारण केलेले काही लोक आहेत. त्यांच्या पशुवृत्ती-वासना प्रबल असल्या पाहिजेत. त्यांना दोष देणे किंवा पापी असे समजून कमी लेखणे हे आम्हाला योग्य नाही. उलट आम्ही त्यांच्यावर प्रेम केले पाहिजे. "पाप्यावर प्रेम करा' असे ख्रिस्त सांगतो. त्यांचा अवमान करण्याचे तुम्हाला काही कारण नाही. स्थितीसातत्याच्या नियमाप्रमाणे, त्यांनी पापी असणे हे स्वाभाविक आहे. एखाद्या पदार्थाला गती मिळाली की, तो सरळ रेषेत सारखा जात असला पाहिजे, असा स्थितीसातत्याचा नियम आहे.
पण, एक स्थितीसातत्याच्या नियमाला आम्ही मागे टाकले पाहिजे, जिंकले पाहिजे. स्थितीसातत्याच्या नियमानुसार उत्पन्न झालेल्या गतीत वृत्तीत बदल करणे, हेच शक्तीचे, चैतन्याचे लक्षण आहे.