डॉ. अनिल अवचट
ऐक्य समूह
Thursday, August 26, 2010 AT 11:00 PM (IST)
बालकांच्या कल्पनासृष्टीत शिरून, त्यांच्यासाठी बालकथा लिहिणं तसं खूप अवघड! मराठी साहित्यात साने गुरुजी, ना. धों. ताम्हणकर, जी. ए. कुलकर्णी, विंदा करंदीकर, शांता शेळके,
गो. नि. दांडेकर, कुसुमाग्रज,
भा. रा. भागवत, शांता शेळके यांनी लिहिलेल्या बालकथांची परंपरा पुढं मोठ्या साहित्यिकांनी फारशी टिकवली नाही. ही उणीव डॉ. अनिल अवचट यांनी भरून काढली. गेली चाळीस वर्षे सामाजिक सेवा कार्यात गर्क असलेल्या अवचटांनी तीन वर्षांपूर्वी मुलांचं मनोरंजन करतानाच त्यांच्या अतर्क्य कल्पना सृष्टीचाही वेध घेत बालकथा लिहिल्या. "सृष्टीत-गोष्टीत', हे त्यांचं बालकथांचं पहिलं पुस्तक. बालवाचकांना ते खूप आवडलं आणि याच पुस्तकाला साहित्य अकादमीनं सुरु केलेला बालसाहित्याचा पहिला पुरस्कारही मिळाला आहे. मराठी साहित्याचा हा गौरव होय!
दोन मुलांना स्वर्गाचं खूप आकर्षण असतं. ढगांना शिडी लावून ती स्वर्गात जायचा प्रयत्न करतात. ढग त्यांना अडवतो, पण वारा मात्र त्यांना थेट स्वर्गात नेऊन पोहोचवतो. तिथं चित्रगुप्त त्यांचं स्वागत करतो आणि आपल्याच महालात ठेवून घेतो. ही मुलं चित्रगुप्ताच्या बायकोला रगडा पॅटीस, पाणी पुरी हे पदार्थ कसे करायचे ते सांगतात, शिकवतात. गोड अमृत पिऊन कंटाळलेल्या चित्रगुप्ताला हे नवे पदार्थ खूप आवडतात. तो स्वर्गातल्या देवांना हे पदार्थ खायला बोलावतो. देवांनाही हे पदार्थ खूप आवडतात. चित्रगुप्ताच्या महालात स्वर्गातल्या खवैय्यांची रीघ लागते, अशी ही कल्पना रम्य गोष्ट, याशिवाय भटकणाऱ्या मुंगीची गोष्ट आणि अन्य अशा शंभर गोष्टी अवचटांनी लिहिल्या आहेत. "वनात-जनात' हे त्यांचं बालकथांचं दुसरं पुस्तक. "अक्षर गंमत', हे तिसरं पुस्तकही प्रसिध्दीच्या वाटेवर आहे. बालसाहित्याचं दालनं समृध्द करणाऱ्या अवचटांना मिळालेल्या या पुरस्कारानं, मराठीतल्या बालसाहित्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर अवचटांनी वैद्यकीय पेशा केला नाही. उपेक्षित आणि वंचितांची दु:ख, व्यथा, वेदना त्यांनी शब्दबध्द केल्या. देवदासी मच्छिमार, यंत्रमागाच्या उद्योगात काम करणारे विणकर आणि कारागिर यांसह अनेक क्षेत्रातल्या विविध समस्यांवर, श्रमिकांच्या व्यथांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला. त्यांचे हे "रिपोर्ताज' गाजले. गर्द आणि गांजाच्या व्यसनात अडकलेल्या युवा पिढीवरही त्यांनी खूप लिहिलं. पुण्यातल्या "मुक्तांगण' या व्यसनमुक्तीचं कार्य करणाऱ्या संस्थेचे ते गेली वीस वर्षे संचालक आहेत. आतापर्यंत हजारो व्यसनी लोकांना त्यांनी व्यसनमुक्त करून, उधळलेले संसार सावरले आहेत. आपण फारसं काही केलं असं ते कधी सांगत नाहीत. झोकून काम करणं, हा त्यांचा स्वभाव आहे. अवचट स्वत:विषयी फार कमी बोलतात. पण, दुसऱ्यांच्या व्यथात मात्र सहभागी होतात. त्यांची भ्रमंती सतत सुरु असते. सामाजिक वैगुण्यही ते अचूक टिपतात. त्यावर मूलगामी भाष्यही करतात. त्यांचा लोकसंग्रहही खूप मोठा आहे. आपल्या लेखनाने एक काळ महाराष्ट्रात वादळं निर्माण करणारा हा लेखक आता वंचितांची दु:ख दूर करायसाठी झटतो आहे.