Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

उत्तर प्रदेश
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 11:17 PM (IST)
Tags: vishesh lekh

नोएडा-आग्रा या नव्या द्रुतगती महामार्गासाठी उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी सक्तीने ताब्यात घेण्याला सुरु असलेला शेतकऱ्यांचा विरोध अद्यापही संपलेला नाही.
गेल्या आठवड्यात अलिगढ आणि आग्रा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संघटितपणे रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या जमिनींना बाजारभावाप्रमाणे  किंमत न देता दडपशाही करून जमिनी ताब्यात घेत असल्यामुळे शेतकरी संतापल्याचे, शेत-कऱ्यांच्या सर्व दल स्थगितीचे म्हणणे आहे. गेल्या आठवड्यात अलिगढपासून पासष्ठ किलोमीटर अंतर असलेल्या टप्पल या गावा-जवळ जमलेल्या हजारो शेतकरी निदर्शकावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाल्याने हे आंदोलन हिंसक झाले. खवळलेल्या जमावाने या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीची वाहने पेटवली. कार्यालयाची नासधूस केली. समितीचे नेते रामबाबू कथिरीया यांना अटक केल्यावर हा हिंसाचार अधिकच तीव्र झाला. आग्रा जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. एकात्मपूर गावातले पोलीस ठाणे संतप्त शेतकऱ्यांनी जाळून टाकले. टप्पलकडे जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर प्रचंड दगडफेक करून पोलिसांच्या मदत पथकांना पळवून लावले.
उत्तर प्रदेश सरकारने प्रति चौरस मीटर 449 रुपये ऐवजी 570 रुपये प्रति चौ. मीटर अशी नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करूनही हे आंदोलन थांबलेले नाही. नोएडा जवळच्या शेतकऱ्यांना  दिल्या गेलेल्या नुकसान भरपाई इतकीच रक्कम या भागातल्या शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, अशी आंदोलकांची मागणी आहे. पोलीस गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलेली नुकसान भरपाई समितीला मान्य नाही. दरम्यान या नव्या महामार्गामुळे पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होईल आणि हजारो झाडे तोडावी लागतील, असे पर्यावरण संघटनांचे म्हणणे आहे. त्यांनीही या नव्या महामार्गाला कडाडून विरोध केला आहे.
टप्पल, आग्रा आणि अलिगढच्या परिसरात हजारो शेतकरी अद्यापही रस्त्यावरच ठाण मांडून आहेत. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे संघर्ष समितीने जाहीर केले आहे. या आंदोलनाला  विरोधी पक्षांनी फूस दिल्याचा आरोप मुख्यमंत्री मायावती यांनी केल्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरु झाली आहे.
दरम्यान कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी शनिवारी अचानक टप्पल परिसरात ठाण मांडून बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेवून, या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. शेतकऱ्यांच्या मागण्या न्याय्य आहेत आणि प्रसंगी आपण त्यासाठी या आंदोलनात सहभागी होवू, रस्त्यावरच धरणे धरू, असेही त्यांनी जाहीर केले. भर पावसात भिजत राहुल गांधींनी टप्पल जवळच्या कृपालपूर गावातील पोलीस गोळीबारात ठार झालेल्या मोहित जाटव आणि जिफरपूरच्या भगतसिंह या शेतकऱ्यांच्या घरी जावून त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. राहुल गांधींनी अचानक या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिल्यामुळे, आंदोलकांना नवे राजकीय बळ मिळाले आहे.
 
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: