Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

विश्वसुंदरीच्या बुद्धिचातुर्याची चुणूक
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 12:33 AM (IST)
Tags: stambha lekh

लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या "मिस युनिव्हर्स 2010' स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोची जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. 83 स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. याआधी तिने 2009 मध्ये  "न्यूएस्ट्रा बेलेझा मेक्सिको' ही स्पर्धा जिंकली होती. "मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकल्यानंतर नवारतेचा आनंद गगनात मावत नव्हता.
दर वर्षी भरणाऱ्या वेगवेगळ्या सौंदर्य स्पर्धा हा एक "ग्लोबल इव्हेंट' झाला आहे. केवळ बाह्यसौंदर्याचे प्रदर्शन न करता अशा स्पर्धांमधून बुद्धिमत्तेची चमकही स्पष्ट दिसते, असा दावा स्पर्धांच्या आयोजकांकडून नेहमीच केला जातो. "मिस युनिव्हर्स' ही अशा स्पर्धांपैकी सर्वात महत्त्वाची स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेतून विश्वसुंदरीचा शोध लावला जातो.  तिच्या नावाची जगभर चर्चा होते. प्रसारमाध्यमांतून तिच्याबद्दल, या स्पर्धेबद्दल विपुल प्रमाणात लिहिलं-बोललं जातं. सुश्मिता सेनच्या रुपाने या स्पर्धेत भारताने प्रथमच बाजी मारली. तेव्हापासून आपल्याकडे या स्पर्धेची विशेष चर्चा होते. नुकतीच झालेली मिस युनिव्हर्स स्पर्धाही त्याला अपवाद नव्हती.
नेहमीप्रमाणे यंदाही "मिस युनिव्हर्स 2010' चा सोहळा लास व्हेगासमधील मंडाले बे रिसॉर्ट आणि कॅसिनोमध्ये दिमाखात पार पडला. ब्रेट मायकेलच्या स्टार परफॉर्मन्सने सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. या झगमगत्या सोहळ्यामध्ये आणि सुरूवातीपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये मेक्सिकोच्या जेमिना नवारतेने "मिस युनिव्हर्स 2010'चा किताब पटकावला. स्पॉटलाईटमध्ये आणि पारंपरिक नृत्याने रंगलेल्या या सोहळ्यात जेमिना रंगून गेली होती. पांढऱ्याशुभ्र रंगाचा इव्हिनिंग गाऊन घातलेल्या जेमिना नवारते हिचे टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन करण्यात आले. "मिस युनिव्हर्स 2010'चा मानाचा किताब पटकावल्यानंतर आनंद शब्दात
व्यक्त करता येत नसल्याची प्रतिक्रिया नवारतेने दिली.
मेक्सिकोची दुसरी युवती
"मिस युनिव्हर्स 2010' च्या स्पर्धेमध्ये जमैकाच्या येंडी फिलिप्सने दुसरा तर ऑस्ट्रेलियाच्या जेस्टिना कॅम्पबेलने तिसरा क्रमांक पटकावला. मिस युक्रेन आणि मिस फिलिपाईन्स या युवतींना चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्विमसूट, इव्हिनिंग गाऊन आणि क्विक थिंकिंग इंटरव्ह्यू अशा तीन विभागात सौंदर्यवतींना परीक्षकांवर आपली छाप पाडायची होती. सौंदर्य स्पर्धेमध्ये एकूण 84 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या सर्व निकषांवर सरस ठरत जेमिना नवारतेने बाजी मारली. 2009 ची मिस युनिव्हर्स ठरलेल्या व्हेनेझुएलाच्या स्टेफिना फर्नांडीसच्या हस्ते जेमिनाला झगमगता मुकुट प्रदान करण्यात आला. याप्रसंगी दोन बहुचर्चित सौंदर्यवतींना मंचावर एकत्र पाहण्याची पर्वणी
प्रेक्षकांना मिळाली.
मेक्सिकोच्या जेमिना नवारतेचा जन्म 22 फेब्रुवारी 1988 मध्ये झाला. ती गुडालाजारामध्ये लहानाची मोठी झाली. चुणचुणीत आणि हुशार जेमिना लहानपणापासूनच कौतुकास पात्र ठरत होती. तिच्या सौंदर्याचीही अनेकदा वाहवा झाली. सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होण्यापूर्वी तिने न्यूट्रिशन या विषयात शिक्षण घेतले. राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर तिच्यातील चुणूक ओळखून या भव्य सौंदर्य स्पर्धेसाठी तिची निवड करण्यात आली.  न्यूएस्ट्रा बेलेझा मेक्सिको 2009 या स्पर्धेत ती सहभागी झाली. या सौंदर्यस्पर्धेत ती सरस ठरणार अशा सर्वांच्या अपेक्षा होत्या. त्या सार्थ ठरवत नवारतेने 33 स्पर्धकांना मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला. कर्ला करिलोनंतर हा किताब जिंकणारी जलिस्कोमधील ती दुसरी सौंदर्यवती ठरली. या स्पर्धेच्या वेळी नवारते न्यूट्रिशन या विषयात पदवी घेत होती. तिने मॉडेलिंगमध्येही कारकीर्द सुरू केली होती. दोन्ही क्षेत्रातील वाटचाल संतुलित राखत तिने स्पर्धेमध्ये यश मिळवले. त्यानंतर "मिस युनिव्हर्स 2010' च्या स्पर्धेकडे नवारतेची वाटचाल सुरू झाली. यासाठी तिने खूप मेहनत घेतली. याच मेहनतीचे फळ नवारतेला किताबाच्या रूपाने मिळाले. "मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकणारी ती मेक्सिकोची दुसरी युवती आहे. याआधी 1991 मध्ये लुपिटा जोन्सला हा किताब मिळाला होता.
आपण स्पर्धेत उतरल्यानंतर करोडो प्रेक्षकांची मने जिंकू अशाही नवारतेला विश्वास होता. स्पर्धेत उतरल्यावर सर्व स्पर्धकांपेक्षा आपला वेगळा ठसा उमटवायचा अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. मेक्सिकोचे नाव उंचावण्याचा निश्चयही नवारतेने केला होता. या निश्चयामुळेच आपला विजय झाल्याचे मत तिनेे व्यक्त केले. या यशामध्ये कुटुंबियांचा सिंहाचा वाटा असल्याचेही तिने सांगितले. "माझ्या घरच्यांशिवाय मी जगू शकत नाही. मला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची मोलाची साथ लाभली आहे' असे सांगताना तिचे डोळे पाणावले होते. नवारतेमुळे मेक्सिकोला तब्बल 19 वर्षांनी "मिस युनिव्हर्स'च्या किताबावर शिक्कामोर्तब करता आले. "मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकल्यानंतर जेमिनाला शिक्षणातून काही काळ विश्रांती घ्यावी लागणार आहे. तरी आपल्या न्यूट्रिशन क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग करणार असल्याचे तिचे
म्हणणे आहे.
जनमत चाचण्या
अलीकडच्या काळात सौंदर्य स्पर्धा हा मोठा इव्हेंट झाल्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष त्याकडे आहे. निवडणुकीच्या काळात घेतल्या जातात, तशा जनमत चाचण्या या सौंदर्य स्पर्धांच्या निमित्तानेदेखील घेतल्या जातात. यंदाच्या मिस युनिव्हर्सच्या ऑनलाईन जनमत चाचणीमध्ये फिलिपाईन्सच्या व्हिनस राजला सर्वात जास्त मते मिळाली होती तर अमेरिकेच्या रिमा फाकिहला दुसऱ्या क्रमांकाची पसंती देण्यात आली होती. भारताची उशोशी सेनगुप्ता हीसुद्धा लोकांची हॉट फेव्हरेट स्पर्धक होती. पण, प्रत्यक्ष स्पर्धेत उशोशीने भारतीयांची निराशा केली. तिला पहिल्या 15 सौंदर्यवतींमध्येही स्थान मिळवता
आले नाही.
"मिस युनिव्हर्स'चा किताब जिंकल्यानंतर जेमिना नवारतेला भरगच्च पगार, डायमंड नेक्सस लॅब्जकडून कोट्यवधी रूपयांचे दागिने, फारौक सिस्टिम्स चि लाईनकडून एका वर्षासाठी हेअर केअर प्रॉडक्ट्‌स, डार बी दारकडून डिझायनर स्विमसूट, शेरी हिलकडून डिझायनर वॉर्डरोब, क्रायोलॉनकडून मेकअपचे महागडे साहित्य अशी भरगच्च बक्षिसे मिळणार आहेत. याचबरोबर नवारतेला न्यूयॉर्क फिल्म ऍकॅडमीकडून एक वर्षाची शिष्यवृत्तीही मिळणार आहे. पुढील कारकिर्दीसाठी जेमिनाला या यशाचा फायदा होईल यात शंका नाही.
वीस वर्षांपूर्वी भारतातील सौंदर्यवती या जागतिक स्पर्धेत फारशा भाग घेत नसत. मुक्त उदार मतवादी अर्थव्यवस्थेच्या अंमलबजावणीनंतर, आलेल्या जागतिकीकरणाच्या लाटेत सौंदर्यस्पर्धांचे वेड भारतीय युवतींना लागले. मिस इंडिया स्पर्धेसाठी भाग घेणाऱ्या युवतींची संख्या वाढली. सुश्मिता सेन, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा यांनी जागतिकी सुंदरीचा किताब जिंकल्यावर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे दारे खुली झाली. पैसा, प्रसिध्दी  मिळवून देणाऱ्या या स्पर्धा भारतीय सुंदरींचे आकर्षण झाल्या आहेत. त्यामुळेच या स्पर्धेत भाग घेणाऱ्या युवती दोन दोन वर्षे तयारी करतात. जागतिक सौंदर्य स्पर्धेत यश मिळाले नाही तरी, स्पर्धक युवतींना मॉडेलिंगच्या क्षेत्रात मागणी कायम राहते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात भारतीय सुंदरी ही या स्पर्धातजिद्दीने उतरत आहेत.
- प्रज्ञा केळकर
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: