Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

कॉमनवेल्थचा नवा"डेंग्यू'
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 12:31 AM (IST)
Tags: lolak

राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) क्रीडा स्पर्धांसाठी विविध खरेदीत आणि बांधकामात झालेले प्रचंड घोटाळे एका पाठोपाठ एक बाहेर यायला लागले. भ्रष्टाचाराची गटारगंगा भरभरून वाहायला लागली. भ्रष्टाचाराची दुर्गंधी सातासमुद्रापार लंडनपर्यंत गेली. अद्यापही नेमका किती आणि कुठे भ्रष्टाचार झाला, कुणी कुणी आपले हात ओले करून घेतले, कुणी खा खा पैसा खाल्ला? या साऱ्याचा शोध लागायचाच आहे. स्पर्धा संपल्यावर भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल, अशी भूमिका केंद्र सरकारने घेतल्यामुळे  विरोधी पक्षांनी, आता त्या स्पर्धांच्या संयोजनात झालेल्या गैरप्रकाराबद्दल काही बोलायचे नाही, असे ठरवलेले दिसते. या स्पर्धा उंबरठ्यावर आल्या तरीही बहुतांश  क्रीडा संकुलांची कामे पूर्ण झालेली नाहीत. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि अन्य महत्वाच्या ठिकाणचे खोदून ठेवलेले रस्ते पूर्ण झालेले नाहीत. नव्या दिल्लीत अनेक ठिकाणी खड्डे आणि दगड, विटा-मातीचे राडेरोडे पडलेले आहेत. गेल्याच आठवड्यात या ढिगाऱ्यामुळे नवी दिल्लीचा परिसर अधिकच विद्रूप झाल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली. सरकार मात्र अत्यंत जलद गतीने मातीचे हे ढिगारे हलवले जातील, अशी ग्वाही देत राहिले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या कुंडलीतले ग्रह काही चांगले दिसत नाहीत. अनागोंंदी-अंदाधुंदी कारभाराचा फटका प्रशासनालाही बसायला लागला. त्यातच धो धो पावसाने  दिल्लीला झोडपून काढले. यमुनेच्या महापुराने, नदीकाठचा सखल भाग, झोपडपट्ट्या जलमय झाल्या. दिल्लीच्या उपनगरात आणि दिल्लीत डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, गॅस्ट्रो या साथीच्या रोगांचा प्रसार झाला. सरकारी दवाखाने रुग्णांनी भरून गेले. डासांचे साम्राज्य वाढले. डासांच्यामुळेच डेंग्यूचा झपाट्याने प्रसार झाल्याची कबुली, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिली. लोकांनी केंद्र सरकारलाही धारेवर धरले. अस्वच्छता, दुर्गंधी, चिखल, गटारांचे पाणी रस्त्यावरून वाहायला लागल्याने निर्माण झालेली मोठी ढबकी अशा त्रासाने वैतागलेल्या दिल्लीकरांनी केंद्र सरकारवर टिकेची झोड उठवली. डेंग्यूचा फैलाव केंद्र सरकारमुळेच झाल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले. तेव्हा मात्र केंद्रीय आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांचा संयम सुटला. त्यांनी कॉमनवेल्थमुळेच डासांचा आणि पर्यायाने डेंग्यूचा प्रसार राजधानीत झाल्याचे सांगून टाकले.  दिल्लीत ठिकठिकाणी झालेली खुदाई, खड्ड्यात साठलेले पाणी, तुंबलेली गटारे यामुळे डासांची पैदास अधिक वाढली. या डासांच्यामुळेच डेंग्यूचा प्रसार दिल्लीभर झपाट्याने झाला, असे त्याचे म्हणणे आहे. या आजाराला त्यांनी "कॉमनवेल्थ डेंग्यू' असे नावही देवून टाकले."कॉमनवेल्थ'च्या तयारीसाठी हजारो कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजत असतानाच, आझाद यांचे हे नवे डेंग्यूचे प्रकरण गाजायला लागले. पण, ते सारे मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावरच शेकले. कॉंग्रेस पक्षाचीच सत्ता असलेल्या दिल्ली सरकारवर डासांच्या फैलावाचे पाप फोडून आझाद यांनी हात वर केले. शीला दीक्षित यांना मात्र आझाद यांचा हा आरोप मान्य नाही. दिल्ली सरकारचा, शहरातल्या दगडमातीच्या ढिगाऱ्याशी, चिखलाशी काहीही संबंध नाही.  दिल्ली महापालिकेमुळेच हे ढिगारे रस्त्यावर पडून राहिल्याचा आरोप त्यांनी तडकाफडकी केला. महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाकडे असल्यामुळे डासांचे उत्पादन आणि प्रसाराची जबाबदारी कॉंग्रेस पक्षाच्या सरकारची नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. आझाद आणि दीक्षित यांच्यातला हा कलगीतुरा असा रंगायला लागला आणि पुन्हा  दिल्लीला तुफानी पावसाने झोडपून काढले. शहरातले मातीचे ढिगारे हलवायचे काम बंद पडले. ठिकठिकाणी छोटी छोटी तळी निर्माण झाली. गटारे आणखी तुंबली. रस्त्यावरही डबकी झाली, परिणामी
डासांना अंडी घालायसाठी पोषक
वातावरण निर्माण झाले. डासांमुळेच
मलेरिया आणि डेंग्यूने पछाडलेल्या रुग्णांच्या संख्येत अशी झपाट्याने वाढ होते आहे आणि दिल्ली कॉमनवेल्थ डेंग्यूग्रस्त झाली आहे. वाद सरकारचा आणि ताप
जनतेला असे  दिल्लीकरांना वाटते,
पण उपयोग काय?
- वासुदेव कुलकर्णी
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: