भानामतीचे अभिनव स्वयंवर
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 11:16 PM (IST)
कलर्स मनोरंजन उपग्रह वाहिनीनं "आयटम गर्ल' राखी सावंतचं जाहीर स्वयंवर रचलं. हा सोहळा (की तमाशा!) चांगला महिनाभर सुरू होता. तिच्याशी विवाह करायला म्हणे हजारो जण इच्छुक होते. त्यातल्या पाच-पन्नास जणांची निवड राखीनं पहिल्या फेरीत केली. दुसऱ्या फेरीत त्यातले पंधरा जण उरले. मग पुन्हा एकमेकांना समजून घ्यायचा आणखी एक तमाशा सुरू झाला. तो ही रंगला. राखीचं स्वयंवर हे बाजारू आहे आणि प्रसिद्धीचा स्टंट आहे, हे प्रेक्षकांनाही माहिती होतं. तिनं शेवटच्या फेरीत म्हणे पती निवडला. साखरपुडाही झाला आणि अपेक्षेप्रमाणं हा विवाह काही झालाच नाही. राखीला अमाप प्रसिद्धी आणि पैसा तेवढा मिळाला (आणि प्रेक्षक मुर्ख ठरले). आणखी काही महिन्यांनी याच वाहिनीनं भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या चिरंजीवांचं, राहुल महाजनचं स्वयंवर आयोजित केलं. प्रमोद महाजनांचा मृत्यू झाल्यावर याच राहुलला दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी चरस ओढताना पोलिसांनी पकडलं होतं. या छंदीफंदी राहुलची प्रसिद्धी झाली ती, त्याच्या असल्या चाळ्यानंच. पुढं काही महिन्यांनी राहुल "बिग बॉस' मध्ये घुसला. तिथंही तो गाजला ते नट्यांचं मालिश करायच्या आचरटपणामुळं. सवंग प्रसिद्धी मिळालेल्या या राहुलचंही स्वयंवर असंच गाजलं. दोन-चार फेऱ्यानंतर शेवटी उरलेल्या तिघींपैकी डिम्पी गांगुलीशी त्यानं खराखुरा विवाह केला (असं म्हणतात). काही दिवसांपूर्वीच याच डिम्पीनं आपल्याला राहुल मारझोड करतो अशी तक्रार करीत त्याचं घर सोडलं होतं. पुन्हा त्यांचं जमलं आणि ती त्याच्या घरी रहायला गेली. गेल्याच आठवड्यात 55 वर्षांचे शशी थरूर आणि त्यांची प्रेयसी सुनंदा पुष्कर यांचा विवाह थाटामाटानं केरळमधल्या पल्लकड या गावी झाला. या दोघांचाही हा तिसरा विवाह! दोघंही संसार करण्यात आणि तो मोडण्यात अनुभवी. आता त्यांचा हा तिसरा विवाह तरी टिकावा अशी अपेक्षा त्यांना आशिर्वाद द्यायसाठी जमलेल्या निमंत्रितांनी व्यक्त केली असावी.
भारतात स्वयंवराची परंपरा तशी प्राचीन काळापासून चालत आलेली. राजकन्येचं स्वयंवर जाहीर करायचं आणि त्या समारंभात कोणता तरी पण लावायचा. तो जिंकणाऱ्याला ती राजकन्या वरमाला घालत असे. श्रीरामानं सितेला असंच जिंकलं. द्रौपदीला अर्जुनानंही स्वयंवरातच मिळवलं. पण, स्वयंवराचे ते सोहळे युवती राजकन्यांचे असत आणि ते त्यांचे वडील म्हणजे राजेच आयोजित करीत.
अहमदाबादेत मात्र स्वयंवराचा अभिनव सोहळा अलिकडेच झाला. स्वयंवरासाठी वधूच स्वत: बोहल्यावर वरमाला घेऊन उभी होती. तिचं वय अवघं 56 होतं. दोन मुलांची आई असलेल्या या वधूचा दुसरा पती दोन वर्षांपूर्वी देवाघरी गेला. तिला एकटीला राहणं अवघड झालं. आपल्याला जीवनाचा साथीदार हवाच, असं तिला वाटायला लागलं. मुलांच्या संसारात तिचं मन रमेना. ती वृद्धाश्रमात रहायला गेली. पण, शेवटी तिनं तिसरा विवाह करायचं ठरवलं. ती स्वत:च वधू वर सूचक मंडळाकडे गेली. 56 वर्षांच्या या वधूला अनुरुप असा वर त्यांच्याकडे नव्हता. शेवटी "विनामूल्य अमूल्य सेवा', या संस्थेनं या वधूसाठी स्वयंवर सोहळ्याचं गुजरातची राजधानी अहमदाबादेत संयोजन केलं. भानुमती व्यास हे या वृद्ध वधूचं नाव! संयोजकांनी दूरदर्शन मनोरंजन वाहिनीप्रमाणंच या स्वयंवराचीही प्रसिद्धी केली. 37 जणांनी स्वयंवरात भाग घेतला. भानुमतीसाठी योग्य वृद्ध वर निवडायसाठी स्वयंवराला जमलेल्या हजारो स्त्री-पुरुष प्रेक्षकांनीही मदत केली. स्वयंवरात योग्य वर निवडायसाठी वाजत गाजत तीन फेऱ्या झाल्या. शेवटी तिघे इच्छुक वर अंतिम फेरीत उरले. जयसुख पटेल, राजेंद्र रावळ आणि अशोक शाह या इच्छुक उमेदवारांतनं योग्य वर निवडायसाठी भानुमतीला प्रेक्षकांचीच मदत घ्यावी लागली. आपल्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या राजेंद्र रावळ यांची तिनं तिसरा पती म्हणून निवड केली. हजारो प्रेक्षकांच्या साक्षीनं भानुमतीनं त्यांना वरमाला घातली आणि हा अभिनव स्वयंवर सोहळा संपला. आपलं वय 56 असलं तरी, उरलेलं आयुष्य जोडीदारासमवेत आणि तेही हक्काच्या घालवायचं आपल्याला अधिकार आहेच, असं तिनं या समारंभात ठासून सांगितलं. तिचा हा नवा पती ज्योतिषी आहे. या दोघांचं
संसारिक जीवन कसं असेल, हे
त्याला माहिती
असेल काय?
- वासुदेव कुलकर्णी