Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

गुजरात
ऐक्य समूह
Wednesday, August 25, 2010 AT 12:32 AM (IST)
Tags: vishesh lekh
गुजरात राज्यातल्या बेकायदा खाण कामावर माहिती अधिकाराच्या शस्त्राद्वारे नियंत्रण आणणाऱ्या, अमित जेठवा यांच्या खुनात भारतीय जनता पक्षाचे जुनागढचे खासदार दिनू सोळंकी यांचा पुतण्या शिवा सोळंकीचा हात असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे, राज्यात खळबळ उडाली आहे. अमित जेठवा हे गेली तीन वर्षे राज्यातल्या बेकायदेशीर खनन उद्योगाच्या विरोधात एकाकीपणे लढा देत होते. सिंहांचे अभयारण्य असलेल्या गीरच्या जंगलातील दगडांच्या खाणी बंद कराव्यात, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यासाठी त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. प्रशासनातल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणेही त्यांनी चव्हाट्यावर आणून राजकारण्यांवर जरब निर्माण केली होती. 19 जुलै रोजी अहमदाबादमध्ये गुजरात उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिल जवळच्या इमारतीत आपल्या वकिलाला भेटून जेठवा बाहेर पडले. ते आपल्या मोटारीत बसत असतानाच, मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांचा गोळ्या घालून खून केला. भरदिवसा झालेल्या या खुनामुळे राज्यात प्रचंड खळबळ उडाली. अमित जेठवाचे वडील भिखूभाई यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत हा खून खासदार  दिनूभाई साळंकी यांनीच घडवून आणल्याचा आरोप केला होता. या खुनाची सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली होती. या खुनानंतर दिनू सोळंकी बेपत्ता झाले होते.
अमित जेठवा यांनी दिनूभाई सोळंकी यांच्याविरुध्द लोकसभेची निवडणूकही लढवलेली होती. अवघ्या सहाच महिन्यापूर्वी झालेल्या प्राणघातक हल्ल्यातून जेठवा वाचले होते. आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रारही त्यांनी सरकारकडे केेलेली होती. पण, त्यांचा असा खून झाला. पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरु केल्यावर दोघा संशयितांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या खुनाचे धागेदोरे खासदार सोळंकी यांचा पुतण्या शिवापर्यंत पोहोचले. अमित जेठवा यांचा खून करायसाठी शिवानेच खुन्यांना सुपारी दिल्याचे, पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी बहाद्दूरसिंह वढेर या पोलिसाला याच प्रकरणात अटक केली होती आणि त्यानेच शिवाच्या सांगण्यावरून जेठवा यांचा खून केल्याचा कबुली जबाबही दिलेला होता.
कोडीनार नगरपालिकेचा अध्यक्ष असलेला शिवा, जेठवा यांचा काटा काढायचा कट करीत होता. जेठवा यांनी बेकायदेशीर खाणीवर सरकारला बंदी आणायला लावली आणि कोडीनार शहरातील मोबईलचे दोन टॉवर्सही हटवायला लावल्यामुळे शिवा त्यांच्यावर संतापला होता. काही झाले तरी, आपल्या मार्गातला हा काटा दूर करायचाच, यासाठी शिवाने अकरा लाख रुपयांची सुपारी गुंडांना दिली. आणि त्यांनी जेठवा याचा खून केला. शिवा हा खासदार सोळंकी यांचा उजवा हात तर आहेच, पण आपल्या काकांच्या खाणी आणि अन्य व्यापाराचे व्यवहारही तोच पाहतो. जेठवा यांचा खून खासदार सोळंकी यांच्याच पुतण्याने घडवून आणल्याचे निष्पन्न झाल्यामुळे राज्यातल्या भाजप सरकारची राजकीय कोंडी झाली आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: