खासदारांना 500 टक्के पगारवाढ ?
ऐक्य समूह
Sunday, August 22, 2010 AT 12:37 AM (IST)
नवी दिल्ली, दि.21(वृत्तसंस्था) ः केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या 300 टक्के पगारवाढीनेही समाधान न झालेल्या विरोधकांना शांत करण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पगारवाढीबाबत फेरविचार करण्याचे मान्य केले आहे. आपण स्वतः पंतप्रधानांशी चर्चा करुन आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना दिले. त्यामुळे आता सर्व खासदारांना संतुष्ट करण्यासाठी केंद्र सरकार 500 टक्के पगारवाढीचा निर्णय घेईल काय, याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारने खासदारांच्या पगारवाढीसंबंधी नेमलेल्या संसदीय समितीने दरमहा 80,001 रुपये बेसिकची शिफारस केली होती. परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खासदारांचा पगार 16 हजारांवरुन 50 हजार रुपये करण्याचा निर्णय झाला. त्याशिवाय त्यांच्या भत्त्यां-मध्येही घसघशीत वाढ करण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले.
परंतु या तिप्पट पगारवाढीने आणि भरमसाठ भत्त्यांनीही भाजप, सपा, राजद आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांचे समाधान झाले नाही. या एवढ्याशा पगारवाढीबद्दल त्यांनी लोकसभा, राज्यसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली आणि पगारवाढीसाठी गोंधळ घातला. त्यातच पूर्ण दिवस संपल्याने सभागृहात काहीच कामकाज होवू शकले नाही.
हा पगारवाढीचाच विषय घेवून आजही सभागृह चालू न देण्याचा विरोधकांचा पवित्रा होता. त्यादृष्टीने लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह आणि गोपीनाथ मुंडे या नेत्यांनी मोर्चेबांधणीही केली होती. म्हणूनच प्रणव मुखर्जी यांनी पुढाकार घेवून पगारवाढीबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन विरोधकांना दिले आहे. आपण स्वतः या संदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले आहे. त्या बदल्यात संसदेचे कामकाज शांतपणे चालू देण्याचे वचन विरोधकांनी दिल्याचे समजते. त्यामुळे आता पुन्हा एकदा 80,001 या रकमेकडे सगळ्या नजरा रोखल्या गेल्या आहेत. प्रणवदा यांच्या मध्यस्थीमुळे आणि 500 टक्के पगारवाढीची आशा प्रफुल्लीत झाल्याने सरकारचे मन सागरासारखे विशाल आहे, असे काही खासदार म्हणाले.