मनाचा उदारपणा
ऐक्य समूह
Sunday, August 22, 2010 AT 09:17 PM (IST)
कित्तुरची राणी चन्नमा अतिशय शूर, चतुर व राजकारणकुशल होती. तशीच ती दिलदार स्वभावाची होती. इंग्रज सरकारने तिचा दत्तकवारस नामंजूर केला. पण झाशीच्या राणीप्रमाणे चन्नमाही डगमगली नाही. इंग्रजांनी कित्तुर संस्थान खालसा केले. संस्थानवर हल्ला केला. रणरागिणी चन्नमाने संस्थान वाचविण्यासाठी युध्दाची तयारी केली. युध्दाला तोंड फुटले. युध्द चालू असताना राणीच्या सैन्याच्या हाती काही इंग्रज मुले सापडली. सैनिकांनी त्या मुलांना पकडून राणीपुढे आणले. अनेकांना वाटले ही शत्रुची मुले आहेत. राणी आता यांना जिवंत ठेवणार नाही. ती मुले भीतीने थरथर कापत होती. आपण आता मरणार असेच त्यांना वाटत होते.
राणीने एकदा त्या मुलांकडे पाहिले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने अत्यंत जळजळीत नजरेने आपल्या सैनिकांकडे पाहिले व ती कडाडली. "तुम्हाला काही दया, माया आहे की नाही? शूर म्हणविता आणि या लहान, निष्पाप मुलांना पकडून आणता? ही मुले निरपराध आहेत. आपले वैर इंग्रजांशी, इंग्रज सैनिकांशी आहे. त्यांच्या बायका मुलांशी नाही.' राणी चन्नमाने त्या मुलांना सोडून दिले. त्यांना खाऊ पिऊ घातले व त्यांच्या आई-वडिलांकडे पाठविले. याला म्हणतात मनाचा उदारपणा!
तात्पर्य : मनाचा उदारपणा हा सर्वश्रेष्ठ असतो.