प्रणवाचा जप
ऐक्य समूह
Sunday, August 22, 2010 AT 09:18 PM (IST)
प्रणवाचा जप अर्थ न समजता केला तर त्यापासून काही फायदा होईल काय?
- हिमालयात राहणारे मुनी प्रणवाचे किंवा दुसरे गाणे म्हणतात किंवा एखादे वाद्य वाजवितात. ते ऐकून सर्प, हरीण आणि इतर वन्य पशू आपले स्थान सोडून मुनीकडे धावत येतात. या प्राण्यांना संगीताचे नियम किंवा गाण्याचे अर्थ काही माहित नसतात. पण, त्यांच्यावर गाण्याचा परिणाम घडून आल्याने ते मोहित होतात. हरीण, सर्प यावर ध्वनीचा जर असा परिणाम होतो तर प्रणवध्वनीचा तुम्ही एकसारखा जप केला असता त्याचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही काय?
प्रत्येक गाण्याला किंवा संगीताला तीन अंगे असतात. 1) गाण्याचा अर्थ, 2) संगीताचे नियम किंवा रागदारी, 3) गाण्याचा स्वर किंवा ध्वनी. ही तिन्ही अंगे तुम्हाला पूर्णपणे अवगत असली तर तुम्हास गाणे अतिशय आवडेल. यापैकी एखादे जरी अंग माहित असले तरी सुध्दा तुम्हाला गाणे थोडेबहुत तरी आवडेल. सर्प, हरीण नुसता ध्वनी ऐकतात. त्यांना गाण्याचा अर्थ किंवा संगीताचे नियम यांचे काही ज्ञान नसते. असे आहे तरी ते गाण्याने मोहून जातात. कित्येकजण सवयांच्या गाण्यातील संगीताच्या नियमांनी मोहित होतात. त्यांना गाण्याच्या अर्थाचे काही महत्व वाटत नाही. दुसऱ्या कित्येकांना संगीताचे नियम माहित नसतात. ते गाण्याच्या अर्थाने आकर्षिले जातात. याप्रमाणेच प्रणवाच्याही तीन बाजू आहेत. 1) केवळ ध्वनी म्हणजे प्रणवाचा तोंडाने उच्चार, 2) प्रणवाचा अर्थ. हा अंत:करणाने जाणावयाचा, 3) आपल्या कृतीत, आपल्या जीवनक्रमात आपले शील सुधारण्यास प्रणवमंत्राची योजना. ही तिन्ही अंगे अवगत असणारा मनुष्य प्रणवाचा तोंडाने जप करतो, प्रणवाचा अर्थ त्याच्या अंत:करणाला पटतो आणि कृतीतही तो प्रणवमंत्र आचरतो. अशा मनुष्याचे जीवन म्हणजे प्रणवाचे सतत गान होय. पण, प्रणवाचा अर्थ तुमच्या अंत:करणाला पटला नसेल आणि तुम्हास तो कृतीत उतरविता येत नसेल तरी त्याचा तुम्ही त्याग करू नका.