नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे बाजारतळ परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष
ऐक्य समूह
Friday, August 20, 2010 AT 12:31 AM (IST)
नीरा, दि. 19 : निर्मलग्राम पुरस्कार मिळालेल्या नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीचे बाजारतळ परिसराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. नीरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाल्यापासून ग्रामपंचायतीने बाजारतळ परिसरात करण्यात येणारी स्वच्छतेची कामे बंद केली असून या परिसरात ग्रामपंचायतीच्या घंटागाडीनेही फिरकणे बंद केले आहे.
नीरा शहरातील ग्रामपंचायतीच्या बाजारतळ परिसरात दररोज भाजी मंडई आणि मच्छी विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात होतो. नीरा शहरातील बुधवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने ग्रामपंचायतीचे कर्मचारी मंगळवार आणि गुरुवार या दिवशी आठवड्यातून केवळ दोन वेळा बाजारतळ परिसरात स्वच्छतेची कामे करतात. त्याचप्रमाणे बाजारतळावरील रहिवाशांच्या घरातील कचऱ्याच्या निर्मूलनासाठी दररोज ग्रामपंचायतीची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी फिरत होती. नीरा शिवतक्रार ग्रामपंचायतीची दि. 30 रोजी पंचवार्षिक निवडणूक होवून 15 दिवस उलटले तरी बाजारतळ परिसरात स्वच्छता आणि घंटागाडीच्या सुविधेकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीची घंटागाडी काही दिवस नादुरुस्त झाल्याने घंटागाडीची सोय उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली होती. परंतु ग्रामपंचायतीने पर्यायी घंटागाडीची व्यवस्था केली आहे. तरीही घंटागाडी बाजारतळ परिसरात फिरकत नाही. परिणामी या परिसरातील रहिवाशी येण्याजाण्याच्या रस्त्यांवर दररोज कचरा टाकत आहेत तर काही सुशिक्षीत रहिवाशी रस्त्यावर खरकटे पाणीही ओतत आहेत. त्यामुळे परिसरात रोगराई निर्माण होण्याची भीती रहिवाशी व्यक्त करत आहेत. बाजारतळावरील मुस्लिम समाजाच्या उर्दू शाळेच्या भिंतीलगत ग्रामपंचायतीने स्वच्छतागृह बांधल्याने शाळेला घाणीच्या आणि दुर्गंधीच्या साम्राज्याने वेढले आहे. त्यामुळे शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आहे. या शाळेत दररोज लहान मुले आणि महिला धार्मिक शिक्षणासाठी येतात. परंतु दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यामुळे शाळेत मुस्लिम समाजातील महिलांनी धार्मिक शिक्षणासाठी येण्याचे बंद केले आहे. याच उर्दू शाळेच्या पाठीमागील रस्त्यावर भाजी मंडई व मच्छी विक्रेते दररोज मोठ्या प्रमाणावर घाण आणून टाकतात. अनेकवेळा ग्रामपंचायतीचे कर्मचारीदेखील याच रस्त्यावर कचरा गोळा करुन टाकतात. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना या घाणीच्या साम्राज्यातून ये-जा करावी लागत आहे. उर्दू शाळेलगतच्या स्वच्छतागृहाच्या दैनंदिन स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. ग्रामपंचायतीने हे स्वच्छतागृह बंद करुन पर्यायी ठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी, अशी मुस्लिम समाजाची मागणी आहे.
बाजारतळावरील मच्छी मार्केटमुळेदेखील अनेक समस्यांना नागरिक व रहिवाशांना नाहक तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून बाजारतळावरील मच्छी मार्केट पर्यायी ठिकाणी हलवण्यासंबंधी नागरिकांची मागणी असतानादेखील ग्रामपंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केले. मच्छी मार्केट आणि उर्दू शाळेलगतच्या स्वच्छतागृहामुळे बाजारतळ परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या साथीच्या रोगराईच्या काळात ग्रामपंचायतीने बाजारतळावरील या गंभीर समस्यांकडे लक्ष केंद्रीत करावे, अशी काही रहिवाशांनी मागणी केली आहे.
दरम्यान, नीरा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक दत्तात्रय लोणकर यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रामपंचायतीची घंटागाडी सध्या नादुरुस्त असल्याने पर्यायी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. बाजारतळ परिसरात घंटागाडीची सुविधा पूर्ववत सुरु करण्यासंबंधी तत्काळ सूचना देण्यात येतील. बाजारतळ परिसरातील स्वच्छतेबाबतही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना देवून नियमित स्वच्छतेच्या कामासंबंधी लक्ष केंद्रीत केले जाईल.