Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राजे प्रतिष्ठानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ऐक्य समूह
Friday, August 20, 2010 AT 12:32 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 19 ः भुईंज, ता. वाई येथील शेतकरी दांपत्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. त्या मोझर कुटुंबियांचे कर्ज माफ करून त्यांच्या कुटुंबियांना नैतिक आधार द्यावा, तसेच त्या कुटुंबाचा कर्जमाफीमध्ये समावेश का नाही, याची सखोल चौकशी व्हावी व अशी घटना घडल्यास शासनाने भरीव तरतूद देण्यासाठी उपाययोजना करावी, याबाबत राजे प्रतिष्ठानतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सातारा जिल्हा हा बळीराजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या याच जिल्ह्यामध्ये या बळीराजाचा आक्रोश ऐकणारं शासनच कानावर हात ठेवून गप्प आहे आणि याचाच परिणाम म्हणजे  भुईंज, ता. वाई येथील सुरेश मोझर व त्यांच्या पत्नी सौ. शोभा मोझर यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. जिल्ह्यातील अशा कितीतरी शेतकऱ्यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. यावर  शासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. मोझर कुटुंबीय मूळचे वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील न्हाळेवाडी येथील असून धोम प्रकल्पामुळे विस्थापित झाल्याने भुईंज येथील चाहूर वस्तीनजिक त्यांना जमीन मिळाली. काही दिवस तेथे वास्तव्य केल्यानंतर त्यांनी जागा घेऊन भुईंज येथे घर बांधले. शासनाच्या व राज्याच्या हितासाठी ज्यांनी आपल्या जमिनी गमावल्या, आपली घरे तोडून धरणाची भिंत उभी केली अशा पुनर्वसितांवर आत्महत्येची वेळ येत आहे. विशेष म्हणजे शासनाने प्रकल्पग्रस्तांसाठी कर्जमाफी केली असताना मोझर कुटुंबियांचा या कर्जमाफीमध्ये समावेश का केला गेला नाही, याची चौकशी व्हावी. शासन एकीकडे नवीन धरणांची कामे करत असताना दुसरीकडे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करत आहे. यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. मोझर कुटुंबियांचा कर्जमाफीमध्ये समावेश का नाही, याची चौकशी व्हावी व अशा घटना घडल्यास शासनाने त्यासाठी भरीव तरतूद करून लवकरात लवकर आदेश द्यावेत, याची अंमलबजावणी त्वरित न झाल्यास राजे प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. त्यास शासनच जबाबदार असेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: