मुंबई मनपा विभाजनाचा कॉंग्रेसचा डाव उधळून लावू : उध्दव ठाकरे
ऐक्य समूह
Friday, August 20, 2010 AT 12:38 AM (IST)
मुंबई, दि. 19 (प्रतिनिधी) : महापालिकेच्या विभाजनाच्या प्रस्तावामागे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षडयंत्र असून कॉंग्रेसचा हा डाव कदापी यशस्वी होऊ दिला जाणार नाही, असे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
मुंबई महापालिकेचे विभाजन करावे या कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी केलेल्या मागणीचा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज प्रखर शब्दात समाचार घेतला. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कॉंग्रेसचा जुना डाव आहे. दिल्लीतील नेते इथल्या छोट्या-छोट्या नेत्यांकडून अशा पुड्या सोडून लोकांची प्रतिक्रिया जाणून घेत असतात. ही त्यांची जुनी पद्धत आहे परंतु हा डाव शिवसेना कदापी यशस्वी होऊ देणार नाही. 50 वर्षांपूर्वी कॉंग्रेस नेत्यांशी लढूनच मराठी माणसांनी संयुक्त महाराष्ट्र मिळवला होता. राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मुंबई तोडण्याचा डाव हाणून पाडू. कॉंग्रेसचे खायचे व दाखवायचे दात घशात घालू, असे उद्धव ठाकरे यांनी "मातोश्री' येथे पत्रकारांशी बोलताना ठणकावले.
मलेरियाच्या साथीबद्दल महापालिकेला दोषी ठरवण्याच्या प्रयत्नांवर सडकून टीका करताना सरकारने यासाठी काय केले, असा सवाल त्यांनी केला. मुंबई महापालिकेला जबाबदार धरणार असाल तर महापालिकेला पुरेसे अधिकार द्या. महापालिकेच्या डोक्यावर एम. एम.आर.डी.ए. सारख्या संस्था बसवून अधिकारावरील अतिक्रमण थांबवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
दुसऱ्या मनपाची गरजच काय ? : भुजबळ
दरम्यान, साडेदहा कोटी लोकांच्या राज्यासाठी एक सरकार पुरेसे असताना दीड कोटीच्या मुंबईसाठी दुसऱ्या महापालिकेची गरजच काय? असा सवाल करताना उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी मुंबई महापालिकेच्या विभाजनास प्रखर विरोध दर्शवला.