Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वैद्यकीय विक्री प्रतिनिधींची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 01:10 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 18 ः फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्हज असोसिएशनच्या आवाहनानुसार देशभरातील किमान दोन लाख विक्री प्रतिनिधी कर्मचारी विविध मागण्यांसाठी दोन दिवस संपावर असून बुधवारी साताऱ्यातील वैद्यकीय व विक्री प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निदर्शने केली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.    निवेदनात पुढे म्हटले आहे, की  वैद्यकीय प्रतिनिधींच्या अखिल भारतीय फेडरेशनने सातत्याने केंद्र सरकारकडे विक्री प्रतिनिधींच्या कामाचे स्वरूप सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्टमध्ये सामील करण्याची तसेच इतर मागण्यांसाठी पाठपुरावा केला असून केंद्र सरकारने बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली काहीही कारवाई केली नाही. जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी कराव्यात, जीवनाश्यक औषधांची सूची लागू करावी, सार्वजनिक क्षेत्रातील औषध व लस उत्पादित करणाऱ्या कंपन्या सुरू कराव्यात, औषधांच्या काळ्या बाजाराची व भ्रष्ट विपणन पद्धतीची उच्चस्तरीय चौकशी करावी या मागण्यांसाठी महाराष्ट्रातील विक्री प्रतिनिधी हे दोन दिवस संपावर आहेत. जीवनाश्यक औषधांच्या किमती कमी करण्यासाठी व विक्री प्रतिनिधी कर्मचाऱ्यांना कायदेशीर हक्क मिळण्यासाठी आम जनतेने पाठिंबा देऊन हा लढा मजबूत करावा, असे आवाहनही पत्रकाद्वारे केले आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: