ओव्हल कसोटीत इंग्लंड अडचणीत
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:06 AM (IST)
लंडन, दि. 18 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने इंग्लंडच्या संघाने मोठी तयारी केली खरी; पण, बुधवारपासून येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाची भोजन वेळेपर्यंतच दाणादाण उडाली. पाकिस्तानकडून पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या वहाब रियाज या जलदगती गोलंदाजाने एका-मागोमाग धक्के देत इंग्लंडची स्थिती 5 बाद 67 अशी दयनीय अवस्था केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या संघाने सावध सुरुवात केली असतानाच, ऍलिस्टर कुक (6 धावा), कर्णधार अण्ड्र्यू स्ट्रॉस (15 धावा), जोनाथन ट्रॉट (12 धावा), केविन पीटरसन (6 धावा) आणि पॉल कॉलिंगवुड (5 धावा) अशा सलामीच्या प्रमुख फलंदाजांना गमावले. इंग्लंड संघाने भोजन वेळेपर्यंत 24 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात कशाबशा 69 धावा जमवल्या होत्या.
पाकिस्तानकडून कसोटी कारकिर्दीस सुरुवात करीत असलेल्या वहाब रियाजने शानदार प्रदर्शन करीत तीन गड्यांना तर मोहम्मद आसिफ, मोहम्मद आमेरने प्रत्येकी एका गड्याला तंबूत धाडले.