
दम्बुला, दि. 18 (वृत्तसंस्था) : श्रीलंका संघाचे खेळाडू सध्या नो बॉलच्या फेऱ्यात अडकले असले, तरी त्यापासून प्रभावित झाल्यामुळे नव्हे, तर अतिरिक्त क्रिकेटमुळे थकलेल्या त्यांच्या संघावर आम्ही निश्चितपणाने मात करू, असा निर्धार न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरने बुधवारी व्यक्त केला.
श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या तिरंगी मालिकेतील चौथा आणि श्रीलंकेविरुद्धचा दुसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडचा संघ खेळणार आहे. त्याबाबत विचारले असता टेलरने ही टिप्पणी केली.
टेलर म्हणाला, श्रीलंका संघाने सलग दोन सामने खेळले असून अशा स्थितीत संघाला विजयासाठी खेळणे तितकेसे सोपे जात नाही. श्रीलंकन संघातील खेळाडू आता चांगलेच थकले आहेत. भारताविरुद्धची कसोटी मालिकाही खूपच खडतर होती. त्यामुळे आम्ही या बाबीचा फायदा उठवणार आहोत. तसे पाहिले तर श्रीलंकेचा संघ हा बलाढ्य आहे आणि ते त्यांच्या मायभूमीत खेळत आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, ते निश्चितपणाने झुंजार खेळाचे प्रदर्शन घडवतील. सेहवागच्या बाबतीत बोलताना तो म्हणाला की, सेहवाग हा शतकाचा हकदार होता पण, तसे झाले नाही. सेहवागसाठी ही खूपच दुर्दैवी बाब आहे. मी तो सामना पहात होतो आणि त्यावेळी मलाही वाटत होते की, तो शतकाचा हकदार आहे. त्याने खूपच चांगली फलंदाजी केली. पण, दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. भविष्यात असे होणार नाही. किवी कर्णधार टेलर म्हणाला, त्याला नो बॉलच्या नियमाची माहिती नाही आणि त्याच प्रकारे मलाही याबाबत अधिक माहिती नाही. अशा प्रकारच्या घटनां-मध्ये नियमांमध्ये बदल करणे खूप महत्वपूर्ण ठरू शकते. टेलर म्हणाला, उद्याच्या सामन्यात आमची रणनीती सुरुवातीस सावध आणि संयमी खेळ करत कोणतीही विकेट न गमावण्याची असेल.
230 किंवा 240 पर्यंतची धावसंख्याही उद्याच्या सामन्यात पुरेशी ठरेल. यापूर्वीच्या सामन्यात सुरुवातीला विकेट जाणारे संघ भलतेच बॅकफूटवर जात आहेत. त्यामुळे आम्ही विकेट राखून खेळण्याचाच प्रयत्न करणार आहोत. संघात कोणताही बदल करण्याबाबत मात्र त्याने नकार दिला. तो म्हणाला, संघात कोणताही बदल केला जाणार नसून आमचे सलामीवीर स्विंग होणाऱ्या चेंडूवर खेळण्याबाबत कौशल्यपूर्ण झाले आहेत. त्यामुळे मला वाटते की, आम्ही चांगली धावसंख्या निश्चितपणाने उभारू.