Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अन्यायकारक पाणी दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी मोर्चा
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 01:12 AM (IST)
Tags: local news
सातारा, दि. 18 : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दि. 1 जूनपासून पाणीदरात अन्यायकारक वाढ केल्याच्या निषेधार्थ व्यापक जनआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत जीवन प्राधिकरणाची देयबीले न भरण्यासह दि. 23 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदरबझार येथील कनिष्क मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्षा सौ. सुजाता राजेमहाडीक, निशांत पाटील, शंकर माळवदे, ऍड. दत्ता बनकर, भाजपाचे नरेंद्र पाटील, राजेंद्र चोरगे, संजय पाटील, बाळासाहेब गोसावी, ऍड. विलास आंबेकर, सौ. स्नेहल नलावडे, पाणी पुरवठा समितीचे सभापती सुनील जाधव, रणजित साळुंखे, सौ. अलका लोखंडे, सिध्दार्थ निकाळजे, सौ. अनुसया गायकवाड व संजय साठे उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना शंकर माळवदे म्हणाले, मंत्रालयातील सचिव, उपसचिवांना या दरवाढीचा काहीही फरक पडत नाही. समान्य नागरिक या दरवाढीमुळे त्रस्त झाला आहे. यासाठी व्यापक जनआंदोलन उभे करुन पाणी बीले न भरण्याचा निर्णय सर्वांनी घ्यावा.
नरेंद्र पाटील यांनी कण्हेर योजना सातारा शहर व उपनगरासाठी फायदेशीर असल्याचे सांगून याचा पाठपुरावा करण्याची मागणी केली. दरवाढीबाबत जनआंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी कृती समिती स्थापन करण्याची सूचना केली. राजेंद्र चोरगे म्हणाले, शहराला पाणी टंचाई केवळ नियोजनाअभावी जाणवत आहे. पाणी पुरवठ्यासाठी अनेक उद्‌भव असून त्याचा पाठपुरावा गरजेचा आहे. 
यावेळी अनेकांनी आपली मते व्यक्त करुन दरवाढीच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: