Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सणासुदीसाठी लोडशेडिंगमध्ये सवलत
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:52 AM (IST)
Tags: main news

मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : गणेशोत्सव आणि रमजान या सणासुदीच्या काळात भारनियमन कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. सायंकाळी 6 ते रात्री 9 आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भारनियमन होणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.
गणेशोत्सव आणि रमजान सणांच्या निमित्ताने राज्यातील विविध भागांतून वीज भारनियमन न करण्याबाबत मागणी झाली होती. या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी इतर स्त्रोतातून वरील काळासाठी अतिरिक्त वीज उपलब्ध करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने यावेळी घेतला आहे. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ऊर्जामंत्री अजित पवार, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, ऊर्जा राज्यमंत्री विजय वडेट्टीवार या बैठकीस उपस्थित होते.
भारनियमन न करण्याची घोषणा करण्यात आलेली असली तरी त्यासाठी मागणी करावी लागणार आहे. भारनियमन रद्द करण्यासाठी 500 मेगावॅट अतिरिक्त विजेची गरज भासणार आहे. बाहेरून ही वीज घ्यावी लागणार आहे. मागणीनुसार सायंकाळी 6 ते रात्री 9 आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत भारनियमन रद्द होणार असले तरी इतर वेळेत भारनियमन करून ते भरून काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यात सध्या सहा तासांपेक्षा जास्त लोडशेडिंग असल्याने अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. सणासुदीच्या काळात तर या गैरसोयीत अधिकच भर पडते. रमजाननिमित्त सायंकाळी सहानंतर मशिदींमध्ये तसेच बाजार पेठांमध्ये गर्दी वाढते. गणेशोत्सवात मंडपाला रोषणाई केली जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. लोडशेडिंगमुळे या सर्व कार्यक्रमांवर बंधने येतात. दिवाळी सण तर प्रकाशाचा उत्सवच असतो. मात्र लोडशेडिंगमुळे उत्सवावर पाणी फेरले जाते.
महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र त्यासाठी अजून बराच अवकाश आहे. मात्र तोवर सणासुदीच्या काळात तरी महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: