
सूरज रणदिववर एका सामन्याची बंदी; दिलशानला सामन्याच्या मानधनाचा दंड
कोलंबो, दि. 18 : भारतीय संघाला विजयासाठी आणि विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला शतकासाठी एका धावेची गरज असताना, जाणूनबुजून नो बॉल टाकण्याच्या कृत्यामुळे साऱ्या क्रिकेट जगतातून टीकेचा लक्ष्य ठरलेल्या श्रीलंका संघाला या वादळापासून वाचवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अखेर हे कृत्य करणाऱ्या ऑफ स्पिनर सूरज रणदिववर एका सामन्याची बंदी घातली तर त्याला हे कृत्य करायला लावणाऱ्या तिलकरत्ने दिलशान या सलामीवीर फलंदाजाला एका सामन्याच्या मानधनाचा दंड ठोठावत या प्रकरणावर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न केला.
संघाचा विजय आणि वैयक्तिक शतक यासाठी एका धावेची गरज असताना, वीरेंद्र सेहवागने आपल्या स्टाईलने षटकार ठोकत विजय आणि शतक याचा आनंद व्यक्त केला. पण, ऑफ स्पिनर सूरज रणदिवने टाकलेला तो चेंडू नो बॉल होता. पण, हा नो बॉल चुकून नव्हे तर जाणूनबुजून टाकला गेल्याचे नंतर स्पष्ट झाले होते. पण, हा चेंडू त्याला कुणी टाकायला लावला, हा प्रश्न निर्माण झाल्यावर कर्णधार कुमार संगकारा याचे नाव प्रथम चर्चेत आले आणि नंतर पॉईंटवर क्षेत्ररक्षण करीत असलेल्या तिलकरत्ने दिलशाननेच रणदिवला सिंहली भाषेत नो बॉल टाकण्यास प्रवृत्त केल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यामुळे सर्व क्रिकेट जगतातून या कृत्याबद्दल रणदिव आणि श्रीलंका संघावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता.
सेहवागने रणदिवच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त करुन खेळ भावनेला चूड लावण्याचा हा प्रकार क्रिकेटलाच घातक असल्याचे स्पष्ट केले होते. अशा स्थितीत कर्णधार कुमार संगकाराने बुधवारी सकाळी कर्णधार या नात्याने या प्रकाराबद्दल माफी मागत स्वत: जबाबदारी स्वीकारत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने या प्रकरणातील दोषी खेळाडूंवर कडक कारवाई करण्याचे संकेतही दिले होते. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही याबाबत भारतीय संघाचे व्यवस्थापक रंजित बिस्वाल यांच्याकडे माफीची याचना केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही हे प्रकरण गांभीर्याने घेतल्यावर बुधवारी दुपारी श्रीलंका क्रिकेट बोर्डाची विशेष बैठक झाली.
या बैठकीमध्ये सूरज रणदिवला एका सामन्यासाठी बंदी, दिलशानला एका सामन्याच्या मानधनाचा दंड ठोठावण्यात आला तर कुमार संगकारा याला मात्र केवळ अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होऊ नये असा इशारा देऊन सहीसलामत सोडण्यात आले.