Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
"ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस' हे पुस्तक नव्या पिढीला दिशादर्शक : कडू-पाटील
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 01:23 AM (IST)
Tags: local news

सातारा, दि. 18 : वयाची सत्त्याहत्तरी ओलांडतानाही न थकता, प्रसन्न मुद्रेने आणि प्रेरक वाणीने युवकांना प्रयत्नवादातून यशस्वितेचा मार्ग दाखविणारे प्राचार्य रमणलाल शहा लिहीत असलेले "ज्ञानदेवेरचिला पाया... तुका झालासे कळस' हे पुस्तक  नव्या पिढीला निश्चितच दिशादर्शक  राहील असा विश्वास जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील यांनी बुधवारी व्यक्त केला.
सातारा येथील प्राचार्य रमणलाल शहा सरांच्या "ज्ञानदेवे रचिला पाया... तुका झालासे कळस' या पुस्तकाच्या संहिता लेखन पूजन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, कर सल्लागार अरुण गोडबोले  उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, सर ज्योतिष-शास्त्राचे गाढे अभ्यासक आहेतच.पण आता केवळ त्या अभ्यासातच अडकून न पडता त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना करून देत, मोठे शब्दभांडार समाजापुढे रिते करण्याचा प्रयत्न केला आहे. आज या पुस्तकाची संहिता पूजन करताना पुस्तक लवकरच पूर्ण होवून त्यांच्या या पुस्तकाला भविष्यातही मोठी मागणी कायम राहील असा विश्वासही  कडू-पाटील यांनी व्यक्त केला.
सोहळ्याच्या प्रारंभी संत तुकारामांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
मिटकॉनचे महेश कुलकर्णी यांनी  प्रास्ताविक केले. ते म्हणाले, शहा सरांनी आत्तापर्यंत अनेक पुस्तकांचे लेखन केले. सर्व वयोगटातील लोकांना आपल्या लेखणीद्वारे वेगळी दिशा दाखविण्याचे काम केले आहे. त्यांच्या या लेखनातून प्रेरणादायी ठरणारे तत्वज्ञान समाजाला मार्गदर्शक म्हणून निश्चितच  उपयोगी पडेल.
प्राचार्य शहा सरांना नुकताच जाहीर झालेला जीवन गौरव पुरस्कार तसेच  ज्योतिष मंडळाच्या सलग तिसऱ्यांदा मिळालेल्या अध्यक्षपदाबद्दल त्यांचा सत्कार आणि या पुस्तकाचा लेखन शुभारंभ असा तिरंगी कार्यक्रम होत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. नितीन शहा यांनी पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते लेखन संहितेचे  पूजन करण्यात आले.
ज्ञानी, ग्रंथप्रेमी, ज्ञानलालसा असणाऱ्या व्यक्तींकडून या ग्रंंथाचे पूजन होत आहे हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे.  या लेखनाला सर्वांच्या शुभेच्छा लाभाव्यात अशी  अपेक्षा आहे. भरकटत असलेल्या  आजच्या युवा पिढीला संत तुकारामांचे विचार आणि उपदेशांची मोठी गरज आहे. सर्वत्र चंगळवाद बोकाळत असताना नीतिमत्ता ढासळू नये यासाठी महाराष्ट्रातील संत वाङमय हे अक्षर नव्हे तर अक्षर वाङमय आहे. त्यामुळे ही संपत्ती चंगळवादी जगापुढे घेवून जाण्याची नितांत  गरज आहे. तुकारामांचे सहज, सोपे आणि आकलन होणारे शब्दधन समाजापर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न माझ्याकडून होत आहे व तो आपणा सर्वांच्या सदिच्छेने  निश्चित पूर्ण होईल, असे पुस्तकाविषयी बोलताना प्राचार्य रमणलाल शहा यांनी सांगितले.
संत तुकारामांविषयी लिखाण करण्याचे शिवधनुष्य प्राचार्य शहा सरांनी उचललेे असून ते निश्चितपणाने पेलतील, असा विश्वास व्यक्त करुन डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी शहा सरांचा लेखन संकल्प लवकरच सिध्दीस जावो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी शहा परिवाराच्यावतीने  कर सल्लागार सी. के. शहा, चं. ने. शहा यांनी प्राचार्य शहा सरांचा संत तुकारामांची मूर्ती आणि शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देवून  तसेच ज्योतिष मंडळाच्यावतीने ऍड. नारायणराव फडके, रमण वेलणकर यांनी सत्कार केला.  प्रदीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन शहा यांनी आभार मानले. यावेळी दै. ऐक्यचे कार्यकारी संपादक वासुदेव कुलकर्णी,  संभाजीराव पाटणे, सी. व्ही. दोशी, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, भरत मेहता, शंकर माळवदे, शिरीष चिटणीस,   राजेंद्र चोरगे, नगरसेवक ऍड. विलास आंबेकर, धनंजय चव्हाण, बाबा हराळे, युवराज पवार, धनराज लाहोटी, सचिन प्रभुणे, सौ. विजया शहा, सौ. केतन शहा व मान्यवर उपस्थित होते.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: