फेनेल यांची राष्ट्रकुलच्या आयोजन स्थळांना भेट
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:03 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा महासंघा(सीजीएफ) चे अध्यक्ष माईक फेनेल यांनी बुधवारी राजधानी दिल्लीस्थित काही आयोजन स्थळांना भेट देऊन माहिती घेतली.
फेनेल 3 ते 14 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी भारत दौऱ्यावर आले असून बुधवारी सकाळी 9 वाजता त्यागराज स्टेडियमवर ते पोहचले. तेथे ते 15 मिनिटे थांबले होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरु स्टेडियमकडे रवाना झाले. तेथे उद्घाटन आणि समारोप समारंभाचे आयोजन होणार असून त्याविषयी त्यांनी माहिती घेतली.
यावेळी फेनेल यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी माईक हुपर हे देखील उपस्थित होते. दोन्ही अधिकाऱ्यांनी ध्यानचंद नॅशनल स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम आणि खेळगावालाही भेट दिली.
फेनेल यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्यात अनेक शासकीय अधिकारी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित, केंद्रीय नगरविकास मंत्री एस. जयपाल रेड्डी आणि आयोजन समितीच्या कार्यकारिणीतील अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे नियोजन आहे. फेनेल यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आयोजन समितीवर भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप केले जात आहेत. फेनेल यांनी आपल्या दौऱ्यापूर्वी अशा प्रकारच्या तमाम चर्चांसंबंधी मोठी चिंता व्यक्त केली होती.