आण्विक दायित्व विधेयकाला डाव्या पक्षांचा विरोध
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 12:48 AM (IST)
नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : वादग्रस्त ठरलेले आण्विक दायित्व विधेयक आज (बुधवारी) संसदीय समितीने संसदेच्या दोन्ही सदनातील पटलावर सादर केले. भारतीय जनता पक्षाने उपस्थित केलेल्या सर्व शंकांची सरकारने दखल घेतल्यामुळे, या पक्षाचा विरोध मावळला असला, तरी डाव्या पक्षांचा विरोध कायम आहे. राज्यसभेत जोरदार घोषणाबाजी करून या विधेयकाला त्यांनी विरोध केल्यामुळे, राज्यसभा गोंधळातच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
भारताने जगभरातील विविध देशांबरोबर नागरी आण्विक करार करण्याची तयारी चालविली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे विधेयक संसदेत मंजुरीसाठी आणण्यात आले. हे करार करता यावेत, यासाठी हे विधेयक मंजूर होणे गरजेचे आहे. दरम्यान, आण्विक दायित्व विधेयक मंजुरीच्या बदल्यात भाजपने नरेंद्र मोदी यांना सोहराबुद्दीन प्रकरणी कचाट्यात सापडलेल्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना वाचविण्यासाठी कॉंग्रेसबरोबर साटेलोटे केल्याचा आरोप राजद आणि सपा यांनी केला आहे. मात्र तो कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी फेटाळून लावला आहे.