पाटण आगारातील लांब पल्ल्याच्या बंद फेऱ्या सुरू करण्याची मागणी
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 01:07 AM (IST)
पाटण, दि. 18 : पाटण आगारातून सुरू असलेल्या पाटण-कोल्हापूर, पाटण-सांगली, पाटण-इस्लामपूर, इस्लामपूर-चिपळूण या फेऱ्या आगार व्यवस्थापनाने बंद केल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वास्तविक पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या फेऱ्या वाढवून अगर सुरू असलेल्या फेऱ्या बंद न करता त्या सुरू ठेवणे अपेक्षित असताना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता या फेऱ्या आगार व्यवस्थापनाने बंद का केल्या? हे प्रवाशांना कळून येत नाही. प्रवासी त्या मार्गावर बस फेऱ्या सुरू असतील अशी समजूत करून घेवून प्रवासाला जाण्यासाठी बाहेर पडतात. मात्र वाहतूक नियंत्रक कक्षात चौकशी केल्यानंतर या फेऱ्या बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवाशांपुढे पाटणहून कराड व कराडहून मिळेल त्या गाडीने पुढे जाणे भाग पडत आहे. थेट गाडी असेल तर सामानाची चढउतार करणे टाळता येते. मात्र थेट गाडी नसल्याने सामान घेवून चढ-उतार करणे वृध्द प्रवाशांना अवघड होत असल्याने या फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी प्रवाशी वर्गातून मागणी करण्यात येत आहे.
पाटण आगारामध्ये काम करणारे बहुतांश वाहक, चालक हे पाटण तालुक्यातील असल्याने त्यांच्या सवडीशास्त्राप्रमाणे ते ड्युटीवर येत असतात. कधी घरगुती अडचण, कधी आजारपण, कधी कंटाळा आला म्हणून तर कधी धार्मिक कार्यक्रम - या ना त्या कारणाने चालक, वाहक दांड्या मारत असतात. त्यामुळे स्थानकप्रमुखांना एखाददुसरा चालक-वाहक जर गैरहजर राहिला तर त्याला लावलेल्या ड्युटीवर कोणाला पाठवायचे? व कसा मार्ग काढायचा? याची कसरत करावी लागते. त्यातच पाटण आगारात मुळात आवश्यक असणाऱ्या चालक, वाहक यांच्या संख्येपेक्षा दहा ते वीस चालक, वाहक कमी आहेत. कमी चालक, वाहकांना गृहीत धरून आगारातून सुरू असलेल्या फेऱ्या कशा पूर्ण करता येतील यासाठी आगारप्रमुख व स्थानकप्रमुख शिकस्तीचे प्रयत्न करत असतात. याची जाणीव चालक, वाहकांनी ठेवून नेमस्त मार्गावरील आपले काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे अपेक्षित असताना हे सहकार्य मिळत नसल्याने या फेऱ्या बंद कराव्या लागल्या की काय? अशी शंका प्रवाशी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
पाटण-पुणे मार्गावर जाणाऱ्या चालक, वाहकांची मनमानी सुरू असून स्वारगेट बसस्थानकाच्या बाहेर प्रवाशांना सोडले जाते. बस स्वारगेट बसस्थानकात नेली जात नाही. त्यामुळे वृध्द प्र्रवाशांना उतरून घेण्यासाठी त्यांचे जे नातेवाईक आलेले असतात त्यांची व वृध्द प्रवाशांची दमछाक होते. या वृध्द प्रवाशांकडे जर भ्रमणध्वनी नसेल तर असेल त्या सामानानिशी कॉईन बॉक्सपर्यंत त्यांना जावे लागते व त्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधावा लागतो. स्वारगेट बसस्थानकाबाहेर सुमारे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतराच्या टप्प्यात कोठेही बस उभी करून प्रवाशांना सोडले जाते. ही बाब योग्य नसून पाटणहून सुटणारी प्रत्येक बस स्वारगेटमध्ये आत नेवून प्रवाशांना सोडावे, अशी मागणीही काही वृध्द प्रवाशांनी "दैनिक ऐक्य'शी बोलताना केली आहे.
पाटणचे आगारप्रमुख व स्थानकप्रमुखांनी या बाबीची गंभीर दखल घेवून त्यांनी चालक, वाहकांना त्याप्रमाणे सक्त सूचना द्याव्यात. त्याचबरोबर पाटण आगारातून सुरू असलेल्या व कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता बंद केलेल्या सर्व फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणीही प्रवाशी वर्गाकडून केली जात आहे.