Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्राभिमान वाढल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य : नीलकंठ महाराज
ऐक्य समूह
Thursday, August 19, 2010 AT 01:07 AM (IST)
पाटण, दि. 18 : आमचा राष्ट्राभिमान वाढल्याशिवाय देशाची प्रगती होवू शकणार नाही. वन्दे मातरम्‌ हा प्राणमंत्र घेवून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्यसैनिक दु:खी आहेत. जे दिवंगत झाले त्यांचा आत्माही अतृप्त असणार याची आपणाला जाणीव झाल्याशिवाय देशाचे वैभव वाढणार नाही. आज आपण ज्या ज्या क्षेत्रात आहोत तेथे प्रामाणिकपणे काम करून नि:स्वार्थपणे सेवारत राहिलो तरच देशाची प्रगती होवू शकते, असे प्रतिपादन आदिमठाध्यक्ष नीलकंठ महाराज यांनी केले.
तीर्थक्षेत्र धारेश्वर, ता. पाटण येथील धारेश्वर गुंफा मंदिरात नीलकंठ शिवाचार्य महास्वामीजी धारेश्वर महाराज यांच्या हस्ते 15 ऑगस्ट निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
धारेश्वर महाराज पुढे म्हणाले, भ्रष्टाचाराने भारताला गुरफुटून टाकले आहे. जोपर्यंत भ्रष्टाचार थांबत नाही तोपर्यंत देशाची प्रगती होवू शकत नाही. आजच्या परिस्थितीत लाखो गरीब उपाशी मरत आहेत. धान्याची कोठारे सडून जात आहेत. हे प्रगतीचे लक्षण आहे का? निसर्गाने या देशाला खूप प्रेम दिलेले आहे. भारत देशाबरोबरच महाराष्ट्रावरही ईश्वराची खरोखरच कृपादृष्टी आहे. आपणास हवे ते सर्व प्रकारचे धान्य, खनिजे, तेल, इतर इंधने, वायू, मसाल्याचे पदार्थ, रत्न, धातू आणि विविध प्रकारच्या वनौषधी निसर्गाने भरभरून दिल्या आहेत. त्या आपण योग्यरितीने समभावाने वाटून घेतल्या पाहिजेत. त्याचे योग्यरितीने संरक्षण केले पहिजे.
आम्ही इंग्रजांच्या स्वातंत्र्यापेक्षा आत्मस्वतंत्र झालो पाहिजे. कामक्रोधादि विकारांपासून स्वतंत्र झालो पाहिजे. षद्दर्मी व षड्‌विकारांवर विजय मिळवून खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाल्याशिवाय आमचा देश स्वतंत्र व संपन्न होवू शकणार नाही, असे सांगून धारेश्वर महाराज म्हणाले, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मनोनिग्रहरूपी शस्त्र घेवून युध्दाची तयारी केली पाहिजे. या युध्दात जिंकलो की देश संपन्न झालाच म्हणून समजा. नम्रता, नि:स्वार्थ, निरपेक्षता ही त्रिसूत्री सांभाळून या देशातील सर्व जाती-धर्मीयांनी स्वधर्म निष्ठेने सांभाळावा व परधर्मीयांना प्रेम देत देशाची प्रगती करावी, असे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते. अरविंद लकडे (मिरज) यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सांगली, कोल्हापूर, बारामती, पुणे, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील दाम्पत्य भक्त भाविक, धारेश्वर हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: