Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारतीय सीमेलगत चीनच्या आक्रमक हालचाली
ऐक्य समूह
Wednesday, August 18, 2010 AT 01:00 AM (IST)
Tags: main news

 डागली संहारक क्षेपणास्त्रे  वारंवार सीमेचे उल्लंघन  लष्कराच्या वाढत्या हालचाली
वॉशिंग्टन, दि. 17 (वृत्तसंस्था) : भारताच्या सीमेलगत चीनच्या लष्कराने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत, एवढेच नव्हे तर या क्षेत्रात चीनने लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्रेही तैनात केली आहेत, अशी माहिती अमेरिकेचे लष्करी मुख्यालय पॅंटॉगानने दिले आहे.
पॅंटॉगानच्या दाव्यानुसार चीनने भारतीय सीमेलगत अत्याधुनिक सीएसारस-6 क्षेपणास्त्रे डागली आहेत. याखेरीज चीनचे हवाई दल सीमेलगत तात्काळ पोहोचेल अशी योजनाही तयार ठेवली आहे. चीन आणि भारत यांच्यातील राजनैतिक आणि आर्थिक संबंधात सुधारणा करण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न झाल्यानंतरही उभय देशात सीमेवर तणाव कायम आहे. चीनकडून भारतीय सीमेचे उल्लंघन आणि आक्रमकसीमागस्त वाढल्यामुळे हा तणाव वाढला आहे. सीमेलगत चीनने आपल्या सैन्याच्या हालचाली वाढविल्या आहेतच याखेरीज जादा सैन्य दलाची कुमक तैनात केली आहे.
थोडक्यात भारत आणि चीन यांच्या दरम्यानच्या 4067 किलोमीटर लांब सीमा क्षेत्रातील परिस्थिती तशी सामान्य दिसत नाही. सर्वात जास्त तणाव अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर असून चीन हा अरुणाचल प्रदेश तिबेटचा हिस्सा असल्याचा दावा सांगत आहे. याखेरीज तिबेटचे पठारच्या बाजूचे सध्याचे अक्साई चीन हा देखील चीनचा भाग असल्याचा दावा मांडत आहे.
अलिकडेच अरुणाचल प्रदेशाच्या मुद्द्यावरून भारत आणि चीन यांनी आपापले दावे मजबूत करण्यासाठी काही पावले उचलली होती. 2009 मध्ये आशियाई विकास बॅंकेने भारताला सुमारे 13 हजार अब्ज रुपये कर्ज देण्याचा प्रस्ताव होता. हे कर्ज मिळू नये म्हणून चीनने खूपच आटापिटा केला होता. अरुणाचल प्रदेशच्या तत्कालीन राज्यपालांनी केंद्राला सांगितले होते की, सैनिकांच्या जादा तुकड्या तसेच लढाऊ विमानेजादा स्तरावर अरुणाचल प्रदेशात पाठवावीत. एका अहवालानुसार 2008 मध्ये भारताने चीनकडून 270 वेळा सीमेचे उल्लंघन झाल्याची नोंद केली आहे. त्याचप्रमाणे 2300 वेळा आक्रमक गस्त घालण्याची आगळीक चीनने केल्याची नोंद आहे.
भारताची मजबूत होत असलेली अर्थव्यवस्था राजनैतिक शक्ती आणि वाढते लष्करी बळ चीनच्या डोळ्यात खुपत आहे. आता तर चीन भारतालगतच्या सीमा क्षेत्रात संहारक क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या बेतात आहे. याखेरीज चीन आपल्या क्षेत्रात रस्ते बांधणीचे काम वाढवत आहे. सीमा क्षेत्रातही समांतर रस्ता बांधण्याचे काम चीनने हाती घेतले आहे.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: