Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी मंत्र्यांचा स्वतंत्र गट स्थापन
ऐक्य समूह
Sunday, August 15, 2010 AT 02:18 AM (IST)
Tags: Main News
नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) ः राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज येथे व्यापक बैठकीत दिली. त्याचबरोबर सुरेश कलमाडी यांचे आयोजन समितीचे अध्यक्षपद अबाधित ठेवले असले तरी संयोजन समितीवर देखरेखीसाठी मंत्र्यांचा एक गट गठित केला आहे. या मंत्रिगटावर स्पर्धेच्या सर्व बाबींवर देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजनातील गैरकारभारावर विरोधकांनी हल्लाबोल चढवला असताना खुद्द पंतप्रधानांनी गंभीर दखल घेतली आहे.  येत्या ऑक्टोबरमध्ये दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत तरी या स्पर्धेची तयारी अद्याप पूर्ण झाली नाही. पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी आज झालेल्या बैठकीत स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. स्पर्धेच्या आयोजनाबाबत आलेल्या तक्रारींची तपशीलवार चौकशी करा आणि जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे फर्मान त्यांनी सोडले.
या बैठकीला क्रीडामंत्री एम.एस. गिल, नगरविकासमंत्री जयपाल रेड्डी, दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित, स्वतः सुरेश कलमाडी आणि अन्य वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.
इकडे भाजपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या गैरव्यवहारासंदर्भात पंतप्रधानांनी संसदेत स्वतः स्पष्टीकरण द्यावे अन्यथा दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद पाडू, असा इशारा दिला आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: