साताऱ्यात सराफी दुकानाला भीषण आग
ऐक्य समूह
Saturday, August 14, 2010 AT 01:55 AM (IST)
सातारा, दि. 13 : सातारा शहरातील सराफ कट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदाशिव पेठेतील श्री वर्धमान ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानास शुक्रवारी सकाळी 8 वाजता शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत दुकानातील किंमती दागिने, फर्निचर, संगणक, लॅपटॉपसह इलेक्ट्रीक साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे 20 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब तात्काळ दाखल झाले. पण, आग आटोक्यात आणताना या अग्निशामक बंबांची निष्क्रियताही सातारकरांना पहावयास मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सदाशिव पेठेत श्री वर्धमान ज्वेलर्स हे दुकान असून सकाळी 8 वाजता हे दुकान उघडलेले नसतानाच, दुकानातून धूर बाहेर येत असल्याचे ये-जा करणारे नागरिक व तेथील अन्य व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शेजारच्या व्यापाऱ्यांनी वर्धमान ज्वेलर्सचे मालक नितीन बोहरा यांना दूरध्वनीवरून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. शहरात सराफी कट्ट्यावर लागलेल्या आगीचे वृत्त समजताच नगरपालिकेचे दोन अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले आणि या बंबाव्दारे आग आटोक्यात आणली जात असतानाच पाण्याची पाईप फुटली. त्यामुळे या पाण्याच्या फवाऱ्यांनी प्रत्यक्ष मदत करणारेही ओलेचिंब झाले होते. यावेळी उपस्थित नागरिकांमध्ये लागलेल्या आगीसह पालिकेच्या अग्निशामक बंबांच्या कार्यक्षमतेविषयी चर्चाही रंगली होती. आता हे बंब आग आटोक्यात आणण्यासाठी वापरण्याऐवजी शहरातील विवाह समारंभ आणि पाण्याच्या टंचाईग्रस्त भागाला पाणी वाटप करणारे ठरत असल्याचे यावेळी बोलले जात होते. श्री वर्धमान ज्वेलर्सला लागलेली आग ही अतिउच्च दाब असणाऱ्या वीज वाहिनीमुळे लागल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी रात्रीपासून दुकानात विजेच्या उच्च दाबाची समस्या होती. याबाबत वीज वितरण कंपनीला कळवण्यातही आले होते. मात्र कंपनीचे कोणीही कर्मचारी दुरुस्तीसाठी आले नव्हते. नंतर आग लागल्यावर मात्र कंपनीचे कर्मचारी दुरुस्तीसाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे नागरिक व संबंधितांमध्ये चांगलीच नाराजी पसरली होती.
दुकानास लागलेली आग सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनी आटोक्यात आली. या आगीत दुकानातील सोने व चांदीच्या दागिन्यांसह फर्निचर, दोन लॅपटॉप, कॉम्प्युटर, प्रिंटर, इलेक्ट्रीक साहित्य मिळून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.