अपराधाला शिक्षा हवीच
ऐक्य समूह
Saturday, August 14, 2010 AT 01:19 AM (IST)
सरस्वतीच्या तीरावर नर आणि नारायण या दोन ऋषींचे आश्रम होते. नर, नारायण भाऊ-भाऊ होते. त्यांचे आश्रम अत्यंत रमणीय, पवित्र होते. त्या आश्रमात पशु-पक्षी मोठ्या गुण्यागोविंदाने वावरत असत. तेथील पाना-फुलांना कोणी परवानगीशिवाय स्पर्शही करीत नसे. एकदा नर समिधा आणण्यासाठी आश्रमाच्या बाहेर गेला होता. त्याचवेळी नारायण नराला भेटण्यासाठी आला. नर आश्रमात नसल्याने नारायण त्याची वाट पाहत बसला. नारायणाला भूक लागली होती, म्हणून त्याने एका वृक्षाखाली पडलेली फळे गोळा केली व तो ती खाऊ लागला. त्याचवेळी नर तेथे आला. नारायण फळे खात आहे हे पाहून नराला अतिशय राग आला. तो नारायणाला म्हणाला, "तू परवानगी न घेता फळे खाल्लीस. तू चोर ठरला आहेस. तुला शिक्षा होणारच. तू आता राजाकडे जा व त्याला सगळी हकीगत सांग. तो तुला योग्य ती शिक्षा करील.'
नारायणाने राजाकडे जाऊन सगळी हकीगत सांगितली व "मला शिक्षा करा' अशी राजाला विनंती केली. राजा म्हणाला, "तुझ्या हातून फार मोठा अपराध घडलेला नाही आणि काही अपराध असेलच तर तो तू कबूल केल्यामुळे नाहीसा झाला आहे.' पण नारायण पुन्हा पुन्हा म्हणाला, "महाराज, मी अपराध केला आहे व अपराधाला शिक्षा झालीच पाहिजे. जर अपराध आहे तर शिक्षा हवीच. म्हणून मला ताबडतोब शिक्षा करा.' राजाला राग आला व त्याने नारायणाचे हात तोडण्याची आज्ञा केली. नारायण नराकडे आला आणि म्हणाला, "ही पाहा राजाने मला शिक्षा केली. आता तू मला क्षमा कर.' नर म्हणाला, "तू अपराधी आहेस. प्रायश्चित म्हणून सरस्वतीच्या पाण्यात स्नान करून ये.' नारायणाने नदीवर जाऊन पाण्यात बुडी मारली व त्याच क्षणी नराच्या तप सामर्थ्याने नारायणाचे हात होते तसे झाले.'
तात्पर्य : चूक झाल्यावर त्याचे प्रायश्चित्त केलेच पाहिजे.