Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

दारु विष आहे
aikya group
Monday, August 09, 2010 AT 10:55 PM (IST)
Tags: Bodh Katha,  

 एका बोटीवर एक कोळ्याचा मुलगा नोकरीला होता. बोटीवरील सगळे लोक दारु पीत होते. त्यांनी त्या मुलाला दारु दिली पण त्याने दारु पिण्यास साफ नकार दिला. त्या बोटीवरील कप्तानाला त्या मुलाचा राग आला. तो दारुने भरलेला ग्लास त्या मुलाला देत म्हणाला, "मी सांगतो म्हणून मुकाट्याने हा दारुचा ग्लास तोंडाला लाव नाहीतर तुला समुद्रात फेकून देईन' तो मुलगा हात जोडून म्हणाला, "साहेब, तुमची आज्ञा मोडताना मला वाईट वाटते. पण साहेब, मला क्षमा करा. मी दारुला स्पर्शही करणार नाही. मी माझ्या आईला तसे वचन दिले आहे.' तू दारु न पिण्याचे वचन आईला का म्हणून दिलेस?' कप्तानाने असे दरडावून विचारले असता तो मुलगा म्हणाला, "साहेब, माझे वडीलसुध्दा बोटीवर नोकरीला होते. त्यांना असेच संगतीने दारुचे व्यसन लागले. ते दारु पिऊन माझ्या आईला मारझोड करायचे. दारुसाठी त्यांनी घरातल्या सगळ्या वस्तू विकून टाकल्या. मग ते दारुसाठी चोऱ्यामाऱ्या करू लागले. दारुमुळे त्यांना अनेक रोग झाले व शेवटी दारु पिता पिताच त्यांना मरण आले. दारु खरोखर विष आहे. म्हणून मी दारूला स्पर्श न करण्याचे आईला वचन दिले आहे. मला कोणतीही शिक्षा करा पण प्राण गेला तरी मी दारु पिणार नाही.'
मुलाचे शब्द ऐकताच त्या कप्तानाचे डोळे खाडकन्‌ उघडले. तो त्या मुलाला म्हणाला, "मित्रा, तू म्हणतोस ते खरे आहे. दारु विष आहे. मी सुध्दा आजपासून दारुला स्पर्श करणार नाही.' असे बोलून दारुचा ग्लास समुद्रात फेकून दिला. तात्पर्य : व्यसनापासून दूर राहणे.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: