Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  बोधकथा  >>  बातम्या

सद्‌गुणांमुळे मोठेपण
aikya group
Saturday, August 07, 2010 AT 11:04 PM (IST)
Tags: Bodh Katha,  
चंद्रगुप्त मौर्याचा नातू,  बिंदुसाराचा मुलगा अशोक हा लहानपणापासून अत्यंत पराक्रमी होता. आपल्या आजोबांप्रमाणे मोठा राजा व्हावे असे त्याला वाटत असे पण तो युवराज म्हणजे मोठा मुलगा नव्हता. त्यामुळे तो राजा होणे कठीणच होते. अशोकाचे वडील बिंदुसार वृध्द झाले तेव्हा आपल्यानंतर अशोकच गादीवर बसावा, असे त्यांना मनापासून वाटत होते. पण हे कसे शक्य आहे? बिंदुसार आपल्या गुरुंना भेटले व त्यांना आपली इच्छा सांगितली. तेव्हा राजगुरु म्हणाले,"मी सर्व राजपुत्रांची परीक्षा पाहतो व त्यात जो लायक ठरेल, त्याला राजा करु.' मग ते राजपुत्रांना म्हणाले, "मी तुमची परीक्षा पाहणार आहे. त्यात जो श्रेष्ठ ठरेल तो बिंदुसारांचा उत्तराधिकारी होईल. उद्या रात्री भोजन झाल्यावर माझ्याकडे या.'
तिघेही राजपुत्र राजगुरुंकडे जाण्यास निघाले. युवराज क्षीरगुप्ताने अगदी भारी किमतीचा पोषाख धारण केला. सुवर्णरत्नांचे अलंकार अंगावर घातले व एका सजविलेल्या हत्तीवर बसून तो राजगुरुंकडे निघाला. दुसरा राजपुत्र मायावीराज तोही क्षीरगुप्ताप्रमाणेच मोठ्या थाटामाटाने राजगुरुंकडे निघाला. सगळ्यात धाकटा राजपुत्र अशोक अगदी साधे कपडे घालून व गुरुंना भेटण्यास जाताना रिक्त हस्ताने जाऊ नये असा विचार करुन गुरुंसाठी एका भांड्यात दूध व चार फुले घेऊन पायी चालत राजगुरुंकडे गेला. तिघेही राजपुत्र राजगुरुंना भेटले. राजगुरुंनी आपला निर्णय दिला. ते म्हणाले, "अशोक हाच राजा होण्यास योग्य आहे. त्याने अत्यंत साधे कपडे घातले होते. यावरुन त्याचे गरिबांवरील प्रेम व्यक्त होते. तो पायी चालत आला यात त्याची नम्रता दिसून येते व त्याने गुरुसाठी दुध व फुले आणली, यात त्याचा साधेपणा दिसतो.' या सद्‌गुणांमुळेच अशोक राजा झाला.
तात्पर्य : सद्‌गुणांमुळे माणसांच्या अंगी मोठेपणा येतो.

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: